मुंबई :  मुंबईच्या शिवाजी पार्कमधल्या (Shivaji  Park) महात्मा गांधी स्विमिंग पूलमध्ये (Mahatma Gandhi Memorial Swimming Pool) सकाळी एक मगर आढळली. यामुळे सर्व कर्मचाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली होती. एका कर्मचाऱ्याने मगरीला पाहिल्यानंतर तिला पकडून ड्रममध्ये ठेवलं. यादरम्यान मगरीने एका कर्मचाऱ्याला चावा देखील घेतला. बाजूलाच असलेल्या प्राणीसंग्रहालयातून मगर धरण तलावात आली असावी अशी शक्यता स्विमिंग पूलच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. याआधी देखील अजगर आणि साप याच प्राणीसंग्रहालयातून सुटून बाहेर पडल्याने लोकांमध्ये घबराट पसरली होती. 


सुदैवाने एका कर्मचाऱ्याने तिला आधीच पाहिले आणि पकडून एका ड्रममध्ये ठेवले.  वन विभाग, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक यांना कळवण्यात आले आहे. जलतरण तलावाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार बाजूलाच असलेल्या  प्राणीसंग्रहालयातून ही मगर  तलावात आली असावी असा संशय आहे.  याआधी देखील अजगर आणि सापासारखे अनेक प्राणी त्याच प्राणीसंग्रहालयातून सुटून बाहेर पडल्याने लोकांमध्ये घबराट पसरली होती.  त्यामुळे या प्राणीसंग्रहालयावर कारवाई करावी अशी मागणी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी  केली आहे.




प्राणी चावले तर कोणाची जबाबदारी?


संदिप देशपांडे म्हणाले, या जलतरण तलावाच्या बाजूलाच एक प्राणी संग्रहालय आहे.  जे अनधिकृत आहे. त्यातून हे प्राणी बाहेर येतात,आधी अजगर आलेला, साप आलेला, जर कोणाला हे प्राणी चावले तर कोणाची जबाबदारी?  मुळात असे प्राणी पाळायला परवानगी कोणी दिली? कोणाचा राजकीय वरदहस्त या प्राणी संग्रहालयात आहे?  ती जागा पालिकेने कोर्टात जिंकली आहे, तरी कारवाई होत नाही. जलतरण तलावाच्या व्यवस्थापनान अनेक वेळा या संदर्भात तक्रार केली आहे, तिथे असल्या प्राण्यांना देखील अतिशय दूरावस्थेत ठेवले जाते मग वनविभाग कारवाई का करत नाही? आज मुंबई आयुक्तांना भेटून हा विषय मी त्यांच्यासमोर मांडणार आहे.


याबाबत अधिक माहिती देताना जलतरण तलाव व नाट्यगृहांचे समन्वयक संदीप वैशंपायन यांनी सांगितले की, रोज पहाटे तरण तलाव सदस्यांसाठी सुरू करण्यापूर्वी संबंधित कर्मचाऱ्यांद्वारे तरण तलावाचे काळजीपूर्वक निरीक्षण करण्यात येते. यानुसार आज पहाटे 5.30 वाजताच्या सुमारास तरण तलावाचे निरीक्षण करीत असताना ऑलम्पिक आकाराच्या  आणि शर्यतीसाठीच्या तरण-तलावात (Olympic size Racing Swimming Pool) मगरीचे पिल्लू आढळून आले. त्यानंतर तज्ञांच्या मदतीने तात्काळ कार्यवाही करीत हे पिल्लू सुरक्षितपणे पकडण्यात आले आहे. हे पिल्लू वनखात्याच्या ताब्यात देण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही सुरू आहे.