सदिच्छा साने हत्या प्रकरणात क्राईम ब्रांचनं दाखलं केलं 1790 पानांचं आरोपपत्र, 100 साक्षीदारांचे जबाब आरोपपत्रात नमूद
Sadichha Sane Murder : गुन्हे शाखेकडून 1790 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सुमारे 125 जणांची साक्ष नोंदवली आहे.
Sadichha Sane Murder : सदिच्छा साने हत्येप्रकरणी गुन्हे शाखेकडून अखेर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. गुन्हे शाखेकडून 1790 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सुमारे 125 जणांची साक्ष नोंदवली असून त्यातील चार प्रमुख साक्षीदारांची साक्ष महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवण्यात आली आहे. याप्रकरणी मिथ्थू सिंह आणि त्याचा मित्र जब्बार अन्सारी या दोघांना अटक करण्यात आली असून ते तुरुंगात आहेत
सदिच्छा आणि मिथ्थू हे 29 नोव्हेंबर 2021 ला रात्री बँडस्टँडवर एकत्र दिसले होते, त्यानंतर ती बेपत्ता झाली. मिथ्थू सिंह वांद्रे परिसरात चायनीज खाद्यपदार्थाची विक्री करायचा. त्या दोघांना शेवटी एकत्र पाहणारे हॉटेलच्या दोन सुरक्षारक्षकांचे व मिथ्थूच्या चायनीज स्टॉलवर काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांचे जबाब सीआरपीसी कलम 164 अंतर्गत महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवण्यात आले आहेत. या जबाबांचाही सदर आरोपपत्रात समावेश आहे. आरोपपत्रात असेही म्हटले आहे की , आरोपी मिथ्थू सिंह हा लाईफगर्ड देखील होता. त्यामुळे त्याला बँडस्टॅंड परिसराची माहिती होती. ज्या भागात त्याने सदिच्छाचा मृतदेह फेकला. त्या भागात बुडलेले मृतदेह बाहेर येत नाहीत.
आरोपीच्या पोलीसांना दिलेल्या कबुली जबाबानुसार, सानेने वांद्रे बँडस्टँडवर सिंहसोबत काही काळ घालवला. सेल्फी घेतल्यानंतर सदिच्छाने मिथ्थूच्या दाढीला हळूवार स्पर्श केला आणि त्याचा गाल ओढला. त्यानंतर त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु तिने नकार दिला आणि दोघांमध्ये जोरदार वाद झाला.
29 नोव्हेंबर 2021 ला सदिच्छा गायब झाली होती. दक्षिण मुंबई येथील जे. जे. ग्रॅन्ट मेडिकल कॉलेजमध्ये सदिच्छा साने ही तिसऱ्या वर्षात शिकत होती. 29 नोव्हेंबर 2021 रोजी ती परीक्षेसाठी जाते म्हणून घरातून निघाली. ती माघारी परतलीच नाही. सदिच्छाचा शोध कुठेच लागत नसल्यानं तिच्या कुटुंबियांनी बोईसर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. सदिच्छा बेपत्ता होऊन 15 दिवस उलटल्यानंतरही जेव्हा तिच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तेव्हा कुटुंबीयांनी तिच्या अपहरणाचा संशय व्यक्त केला होता. सदिच्छाचा शोध घेण्यासाठी सोशल मीडियासह बँड स्टॅन्ड बस स्थानकासह वांद्रे परिसरात अनेक ठिकाणी तिचे फोटो लावण्यात आले होते. तर पालघरमध्येही या प्रकरणी अनेक मोर्चे निघाले होते.
एकीकडे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपीचा शोध लावत खुनाचा गुन्हा दाखल केला मात्र दुसरीकडे सदिच्छाच्या वडिलांनी सदिच्छा खून नसून तिचं अपहरण करण्यात आल्याची प्रतिक्रिया दिली पोलीस केवळ तपासात विलंब लावत असल्याचा देखील आरोप सदिच्छा वडिलांनी केला होता.