Mumbai Corona Update : मुंबईत आज 429 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत, कालच्या तुलनेत ही रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी झाली आहे. बुधवारी मुंबईत 447 रुग्ण आढळले होते. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी मुंबईत 429 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 822 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 3 हजार 698 इतकी झाली आहे. तर कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 949 दिवसांवर आला आहे. कालच्या तुलनेत यामध्ये तब्बल 109 दिवसांची वाढ झाली आहे.
याशिवाय मुंबईतील साप्ताहिक कोरोना रुग्णवाढीचा दर 0.07% टक्के इतका झाला आहे. मुंबईत मागील 24 तासांत दोन रुग्णांचा कोरोनावर उपचार घेताना मृत्यू झाला आहे. तसंच आज नव्याने सापडलेल्या 429 रुग्णांपैकी 71 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 36 हजार 977 बेड्सपैकी केवळ 1 हजार 188 बेड वापरात आहेत.
मुंबईकरांना मोठा दिलासा
आज नव्याने समोर आलेल्या माहितीत मुंबईतील एकही इमारत किंवा परिसर प्रतिबंधित क्षेत्र (containment zone) नसल्याचं पालिकेने कळवलं आहे. यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण असे असतानाही काळजी घेणं अजूनही गरजेचं असल्याचं प्रशासनाकडून सांगितलं जात आहे.
WHO चं काळजी घेण्याचं आवाहन
जागतिक आरोग्य संस्थेने कोरोनाबाबत काळजी घेण्याचं आवाहन नागरिकांना केलं असून ओमायक्रॉननंतर देखील नवा व्हेरियंट येऊ शकतो अशी शक्यताही त्यांनी वर्तविली आहे. कोव्हिड 19 तांत्रिक दलाच्या की मारिया वान केरखोव यांनी सावध इशारा देताना, 'आम्ही या विषाणूबद्दल बऱ्याच गोष्टी जाणतो. पण यात अनेक बदल होत असल्याने आम्ही यावर नजर ठेवून आहोत. त्यामुळे नागरिकांनीही काळजी घेणं गरजेचं आहे.'
महाराष्ट्रात तयार झाली भारताची पहिली मेसेंजर आरएनए कोरोना लस
वर्षभरापासून भारतामध्ये कोरोना लसीकरण सुरु आहे. कोरोना महामारीला रोखण्यासाठी लसीकरण एक महत्वाचं शस्त्र ठरत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची गुरुवारी देशातील कोरोना परिस्थितीसंदर्भात पत्रकार परिषद झाली. यामध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देशाली कोरोना स्थितीची माहिती देण्यात आली. त्यासोबतच एक दिलासादायक बातमी दिली आहे. भारताची पहिली मेसेंजर आरएनए Messenger RNA (mRNA) कोरोना लस जवळपास तयार झाली आहे. ही लस पुण्यात तयार झाली आहे. भारताची पहिली मेसेंजर आरएनए कोरोना लस अंतिम टप्यात आहे. ही लस पुण्यातील जेनोवा बायोफार्मास्युटिकल्स (Gennova Biopharmaceutical ) यांनी विकसीत केली आहे. पुढील काही दिवसांमध्ये ही लस वापरास येऊ शकते, असे निती आयोगाचे सदस्य व्ही के पॉल यांनी सांगितले.
संबंधित बातम्या :
- Covid19 : कोरोनाचा डोळ्यांवर परिणाम; 90 टक्के लोकांच्या दृष्यमानतेत फरक झाल्याचा दावा
- mRNA vaccine : पुण्यात तयार झाली भारताची पहिली मेसेंजर आरएनए कोरोना लस
- Covid19 : सावधान! सांडपाण्याच्या नमुन्यांमध्ये आढळले कोरोनाचे चार 'गुप्त' प्रकार, धोका वाढण्याची शक्यता
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha