एक्स्प्लोर
इंद्राणी आणि पीटर मुखर्जीच्या घटस्फोटाला कोर्टाची मंजुरी
शीना बोरा हत्याकांड खटल्यातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जी आणि तिचा नवरा पीटर मुखर्जी यांना अखेर वांद्रे कुटुंब न्यायालयाने सहमतीने घटस्फोट मंजूर केला आहे.

मुंबई : शीना बोरा हत्याकांड खटल्यातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जी आणि तिचा नवरा पीटर मुखर्जी यांना अखेर वांद्रे कुटुंब न्यायालयाने सहमतीने घटस्फोट मंजूर केला आहे. गेल्या सतरा वर्षांपासूनचे त्यांचे पती-पत्नीचं नातं अखेर गुरूवारी संपुष्टात आलं. इंद्राणी आणि पीटर यांचा विवाह 2002 मध्ये झाला होता. इंद्राणीचं हे तिसरं तर मुखर्जीचं दुसरं लग्न होतं. उद्योगपती असलेल्या पीटरपेक्षा इंद्राणी वयानं बरीच लहान आहे. मात्र, 'आता लग्नाच्या नात्यामध्ये काही तथ्य राहिलेलं नाही आणि ते पुन्हा पूर्ववत होणार नाही', असे कारण देऊन इंद्राणीने गेल्यावर्षी पीटरला घटस्फोटाची नोटीस बजावली होती. दोघांच्या सहमतीनं हा घटस्फोट घेतल्यामुळे संपूर्ण प्रक्रिया सुलभ झाली असे त्यांच्या वकिलांकडून सांगण्यात आलं आहे. मालमत्ता, परदेशामधील संपत्ती आणि रोखे आदींच्या बाबतही सहमतीने निर्णय घेण्यात आला आहे. दोघांनी दाखल केलेल्या सहमती पत्राबाबत न्यायालयानं समाधान व्यक्त करत हा घटस्फोट मंजूर केला. शीना बोरा ही इंद्राणीची मुलगी असून तिची 2012 मध्ये इंद्राणीने हत्या घडवून आणल्याचा आरोप पोलिसांनी ठेवला आहे. या कटाची संपूर्ण माहिती पीटरलाही होती, असा सरकारी पक्षाचा आरोप आहे. विशेष म्हणजे हत्येनंतर तीन वर्षांनी या प्रकरणाचे गूढ उलगडले होते. याप्रकरणी इंद्राणी मुखर्जी, तिचा पूर्व पती संजीव खन्ना आणि इंद्राणीचा ड्रायव्हर श्यामवर रायला अटक झाली आहे. ज्यात श्यामवर राय हा माफीचा साक्षीदार झाल्याने या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण























