मुंबई : मुंबईतील खासगी डॉक्टरांनी 15 दिवस कोविड-19 चे रुग्ण असलेल्या सरकारी रुग्णालयांमध्ये सेवा द्यावी, असं आवाहन वैद्यकीय शिक्षण-संशोधन मंडळाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी केलं आहे. तसंच आवाहनाला प्रतिसाद न दिल्यास खासगी डॉक्टरांवर कारवाई केली जाऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे. मुंबईत अॅलोपॅथीचे अंदाजे 30 हजार डॉक्टर आहेत, त्यापैकी 13 हजार डॉक्टर इंडियन मेडिकल असोसिएशनचे सदस्य आहेत.


दरम्यान, 55 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या खासगी डॉक्टरांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे.


देश सध्या कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत आहे. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक आहे. केवळ राज्यातच नव्हे देशातही कोरोनाबाधितांची सर्वाधिक संख्या मुंबईत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या संकटाचा सामना अधिक प्रभावीपणे करण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना आणि महत्त्वाची पावलं उचलली जात आहेत.


मुंबई महापालिकेने वारंवार आवाहन करुनही अनेक खाजगी डॉक्टरांनी आपले दवाखाने, नर्सिंग होम सुरु केलेले नाहीत. परवाना रद्द करण्याचा इशारा देऊनही परिस्थिती फारशी बदललेली नाही. त्यामुळे आता सरकारने मान्यताप्राप्त आणि पदवीधर डॉक्टरांनी कोविड-19 चे रुग्ण असलेल्या सरकारी रुग्णालयांमध्ये सेवा देण्याबाबत आदेश काढले आहेत.



वैद्यकीय शिक्षण संशोधन मंडळाने जारी केलेल्या पत्रकात डॉ. तात्याराव लहाने यांनी खासगी डॉक्टरांना आवाहन केलं आहे की, "कोविड-19 रुग्णांच्या उपचारांसाठी किमान 15 दिवस तुमची सेवा द्या. तुम्हाला ज्या ऐच्छिक परिसरात सेवा द्यायची आहे त्याची माहिती महापालिकेचे अधिकारी मिलिंद कांबळे यांना द्या."


तसंच या आवाहनाला प्रतिसाद न दिल्यास खासगी डॉक्टरांवर कारवाई केली जाऊ शकते, असंही तात्याराव लहानेंनी म्हटलं आहे. "ड्युटीवर गैरहजर राहणं हे मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाच्या आचारसंहितेचं उल्लंघन समजून अशा डॉक्टरांवर साथरोग प्रतिबंध कायदा 1897 नुसार कारवाई करण्यात येईल," असं डॉ. लहाने यांनी सांगितलं.


केवळ अॅलोपथीच नाही इतर डॉक्टरांचाही समावेश करा : आयएमए अध्यक्ष
"खाजगी डॉक्टरांनी 15 दिवस कोविड रुग्णालयांमध्ये सेवा द्यावी या आवाहनाचे स्वागत आहे. मात्र, अशाप्रकारची सेवा देण्याची सूचना ही केवळ अॅलोपथी डॉक्टरांनाच देण्यात आली आहे. इतर डॉक्टरांचाही त्यात समावेश व्हावा. तसंच जे खाजगी डॉक्टर आपल्या खाजगी डिस्पेन्सरीज, नर्सिंग होममध्ये सेवा देत आहेत त्यांनाही 15 दिवस कोविड रुग्णालयात काम करायचे का याबाबत स्पष्टता या पत्रकात देण्यात आली नाही,"अशी प्रतिक्रिया आयएमएचे अध्यक्ष अविनाश भोंडवे यांनी दिली आहे.


Coronavirus | मुंबईतील खासगी डॉक्टरांना सरकारी रुग्णालयातील कोरोना रुग्णांवर उपचार करणं बंधनकारक