मुंबई : देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहीमेला सुरुवात झाली. सध्या फक्त सरकारी रुग्णालयांमध्येच कोरोना लस दिली जात आहे. परंतु लवकरच खासगी रुग्णालयांमध्येही कोरोना लसीकरण होणार आहे. यासंदर्भात येत्या दोन ते तीन दिवसात निर्णय होण्याची शक्यता आहे.


राज्य सरकारने खाजगी रुग्णालयांतही लसीकरण केंद्र सुरु करण्याविषयी मुंबई महापालिकेला सूचित केले आहे. त्या अनुषंगाने मुंबई महापालिकेने शहरातील खाजगी रुग्णालयांची एक यादीही तयार केली आहे. ज्या रुग्णालयांमध्ये लसीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा असतील, वेटिंग रुम, ऑब्जर्वेशन रुम आणि तातडीच्या वैद्यकीय सुविधा देणारी यंत्रणा असेल अशा खाजगी रुग्णालयांना लसीकरणासाठी परवानगी देता येईल.


खाजगी रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरु केल्यानंतर सुरुवातीला त्यांच्या कर्मचारी, डॉक्टरांना तिथेच लस दिली जाईल आणि नंतर तिसऱ्या टप्प्यात सर्वसामान्यांसाठी लसीकरण खुले केले जाईल, तेव्हा या खाजगी रुग्णालयांतील लसीकरण केंद्रेही वापरली जातील.


आतापर्यंत पाच लाखांहून अधिक जणांचं लसीकरण : राजेश टोपे
राज्यात आतापर्यंत एकूण पाच लाखांपेक्षा जास्त जणांना कोरोना लस दिल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यसभरातील 652 केंद्राच्या माध्यमातून लसीकरण सुरु आहे. कोविन अॅपवर आतापर्यंत 10 लाख 54 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली असून त्यापैकी चार लाख 68 हजार आरोग्य कर्मचाऱ्याचं लसीकरण झालं आहे. तर पाच लाख 47 हजार फ्रण्टलाईन वर्कर्सची नोंद झाली असून त्यापैकी 41 हजार 453 जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.


आता केरळमधून येणाऱ्या प्रवाशांनाही कोविड चाचणी सक्तीची
दिल्ली, राजस्थान, गोवा, गुजरात या चार राज्यांनंतर केरळ या पाचव्या राज्याचा सक्तीच्या कोविड चाचणी नियमात समावेश करण्यात आला आहे. कोविड चाचणीचा आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट असल्याशिवाय केरळहून येणाऱ्या प्रवाशांना मुंबईत प्रवेश दिला जाणार नाही. केवळ विमानतळावरुन येणाऱ्या प्रवाशांचीच कोविड चाचणी होणार आहे. रेल्वे आणि रस्ते प्रवासासाठी कोविड चाचणीचा रिपोर्ट सक्तीचा नाही.