मुंबई :  महाराष्ट्रात परवाच्या तुलनेत काल कोरोना रुग्णांचा आकडा वाढल्याचे समोर आले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी राज्य सरकारकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज मुंबईत स्पाईस हेल्थच्या तीन फिरत्या कोविड चाचणी प्रयोगशाळा व्हॅनचे लोकार्पण केले. भविष्यात ही सुविधा संपूर्ण राज्यात उपलब्ध  करून देण्यात येईल असे सांगतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या दरात कोविड चाचणीची सुविधा उपलबध करून दिल्याबद्दल स्पाईस हेल्थला धन्यवाद दिले. या तीन व्हॅनच्या माध्यमातून मुंबईत दररोज अतिरिक्त 3 हजार कोरोना चाचण्या करता येतील. त्याचा अहवाल 24 तासात मिळेल आणि फक्त 499 रुपयांमध्ये कोरोना चाचणी करणे शक्य होईल अशी माहिती आयुक्त चहल यांनी यावेळी दिली.


एनएबीएल ॲक्रीडेटेड आणि आयसीएमआरची मान्यता असलेल्या स्पाईस हेल्थच्या तीन फिरत्या कोविड चाचणी प्रयोगशाळांचे लोकार्पण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. गोरेगाव, बीकेसी आणि एनआयसी डोम वरळी येथील कोविड केंद्रात  या तीन फिरत्या चाचणी प्रयोगशाळा व्हॅनची उपलब्धता करून देण्यात आली आहे.


यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाला, तेव्हा पुणे आणि मुंबईत कस्तुरबा येथे दोन ठिकाणीच कोरोना चाचणी प्रयोगशाळा कार्यरत होत्या. शासनाने काही दिवसांमध्ये ही संख्या 500 वर नेली. माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानातून कोरोना पॉझेटिव्ह रुग्णांचा शोध घेण्यात आला. संशयितांची तपासणी करतांना सहव्याधीग्रस्तांचा शोध ही घेण्यात आला. कोरोनावर आता लस उपलब्ध झाली असली तरी विविध देशात कोरोनाचे नवे स्ट्रेन येतांना दिसत आहेत. त्यावर संशोधनही सुरु आहे. त्यामुळे  आज ही कोविड रुग्णांचा शोध घेऊन त्यावर उपचार करण्याला शासनाचे  प्राधान्य आहे. अशा गरजेच्यावेळी स्पाईस हेल्थ ने पुढे येऊन परवडणाऱ्या दरात  कोरोना चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली, कमी वेळेत त्या चाचणीचा अहवाल ही मिळणार आहे त्यामुळे सर्वसामान्य लोकांना याचा नक्की लाभ होईल. मुंबईत या तीन फिरत्या चाचणी प्रयोगशाळांच्या माध्यमातून कोरोना रुग्णांचा शोध घेण्याचा मोठा ड्राईव्ह हातात घेता येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.


राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी रुग्णांचा शोध घेणे त्याच्या संपर्कात आलेल्यांच्या तपासणी करून घेणे याला आजही खुप महत्व आहे. त्यानंतच उपचार, कॉरंटाईन करणे शक्य आहे अशा महत्वाच्यावेळी सामाजिक दायित्वातून स्पाईस हेल्थने ही सुविधा  उपलब्ध केल्याचा उल्लेख ही त्यांनी आवर्जुन केला.