मुंबई : देशातील कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात होणार आहे. या टप्प्यात 18 ते 44 वर्षामधील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. मात्र लसींचा पुरवठा कमी असल्याने महाराष्ट्रात मोजक्या स्वरुपात लसीकरण होणार आहे. या मोहिमेसाठी राज्याला तीन लाख डोस उपलब्ध झाले आहेत. तीन लाखांपैकी मुंबई, ठाणे आणि पुण्याला प्रत्येकी 20 हजार डोस उपलब्ध होणार आहेत. मुंबईत महापालिकेच्या पाच केंद्रांवर लसीकरण पार पडणार आहे.
मुंबई महापालिका प्रशासनाला कोविड प्रतिबंधात्मक लसीचे मोजकेच डोस प्राप्त झाले आहेत. त्यामुळे आज (1 मे) महापालिकेच्या पाच केंद्रांवर केवळ 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींचं लसीकरण होणार आहे. हे लसीकरण केवळ 'कोविन ॲप'मध्ये नोंदणी केलेल्या व्यक्तींसाठी असणार आहे. तसंच सध्यातरी लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांनाच या सुविधेचा लाभ दिला जाणार आहे. भविष्यात लसीचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्यानुसार त्या-त्या वेळी योग्य निर्णय घेतला जाईल, असं महापालिकेने म्हटलं आहे.
Maharashtra Vaccination : 18 ते 44 वयोगटासाठी राज्यात आजपासून मोजक्या स्वरुपात लसीकरण
दरम्यान मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्वच पात्र नागरिकांचं लसीकरण व्हावं, यासाठी महापालिका आवश्यक ते सर्व नियोजन करत आहे. नागरिकांनी लसीकरणासाठी गर्दी करु नये आणि कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करावं, असे आवाहन महापालिका प्रशासनाने पुन्हा एकदा केलं आहे.
मुंबई महापालिकेच्या 'या' पाच रुग्णालयांमध्ये लसीकरण
1. बा. य. ल. नायर सर्वोपचार रुग्णालय (मुंबई सेंट्रल परिसर)
2. सेठ वाडीलाल छत्रभुज गांधी व मोनजी अमिदास व्होरा सर्वोपचार रुग्णालय, राजावाडी (घाटकोपर परिसर)
3. डॉ. रुस्तम नरसी कूपर सर्वोपचार रुग्णालय (जुहू विलेपार्ले पश्चिम परिसर)
4. सेव्हन हिल्स रुग्णालय (अंधेरी परिसर)
5. वांद्रे कुर्ला संकुल येथील जम्बो कोविड सेंटर