मुंबई : राज्यात आजपासून 18 ते 44 वयोगटासाठीही लसीकरण सुरु होणार आहे. मात्र लसींचा पुरवठा कमी असल्याने राज्यात मोजक्या स्वरुपात लसीकरण होणार आहे. या मोहिमेसाठी राज्याला तीन लाख डोस उपलब्ध झाले आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यात मोजक्या स्वरुपात आज हे लसीकरण सुरु होणार आहे. तीन लाखांपैकी मुंबई, ठाणे आणि पुण्याला प्रत्येकी 20 हजार डोस उपलब्ध होणार आहेत. तर राज्यातील विविध जिल्ह्यांना लोकसंख्येच्या प्रमाणानुसार 10 हजार, 7500 आणि 5000 डोस असे वाटप करण्यात आलं आहे.
18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण मोहिमेला कोणत्या जिल्ह्याला किती डोस?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील 1 मे पासून सुरु होणाऱ्या 18 ते 44 वयोगटासाठीच्या लसीकरण मोहिमेबाबत सांगितलं की, "राज्यातील 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी स्वीकारण्यास राज्य शासन तयार असून यासाठी लागणारी सर्व रक्कम एका चेकद्वारे देऊन लस विकत घेण्याचीही तयारी आहे. परंतु लसीची उपलब्धता ही मर्यादित असल्याने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांनी लगेच 1 मे पासून लस केंद्रांवर गर्दी करु नये, कोविन ॲपवर नोंदणी केल्यानंतर जी तारीख आणि वेळ मिळेल त्या दिवशी जाऊन लस घ्यावी. राज्याची लसीकरणाची क्षमता रोज 10 लाख एवढी असली तरी या वयोगटासाठी फक्त 3 लाख डोस राज्याला मिळाल्याची माहितीही उद्धव ठाकरे यांनी दिली.
मुख्यमंत्री म्हणाले, "1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस देण्यास प्रारंभ होणार आहे. राज्य शासनाने ही लस मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात या वयोगटात 6 कोटी नागरिक आहेत, त्यांना प्रत्येकी 2 डोस म्हटले तरी 12 कोटी लसींची आवश्यकता आहे. आपण दररोज 10 लाख लोकांचे लसीकरण करु शकतो एवढी महाराष्ट्रात क्षमता आहे. परंतु लस वितरण हे ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरप्रमाणे केंद्र सरकारच्या अखत्यारितील विषय आहे."
राज्याला उपलब्ध होणारी लस ही मर्यादित आहे. त्यामुळे थेट लस केंद्रावर जाऊन गर्दी करु नये. लसीकरण केंद्रे ही कोविड प्रसाराची केंद्रे होऊ नयेत यासाठी काळजी घेण्याची गरज आहे, असंही ते म्हणाले. राज्याला जसजशी लस उपलब्ध होईल तसतशी सर्व नागरिकांना लस देण्याची सुनियोजित व्यवस्था करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.