मुंबई : एकीकडे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असतानाच लसीकरण करा, म्हणून सरकार लोकांना आवाहन करत आहे. मात्र, दुसरीकडे लसीकरण कार्यकाळातील सावळा गोंधळ समोर येत आहे. कारण, लस न घेताच लस घेतल्याचं प्रराणपत्र मिळाल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. 


घाटकोपरमधल्या नाईक दांपत्यानं लसीचा पहिला डोस घेतला मात्र दुसरा डोस घेण्याआधीच त्यांना लसीचे डोन्ही डोस पूर्ण झाले म्हणून अभिनंदनाचा मेसेज आला आणि त्यासंदर्भातील प्रमाणपत्रही मिळालं.


घाटकोपरमधील नाईक कटुंबातील ६५ पार असलेलं नाईक दांपत्य. विठ्ठल नाईक आणि सरस्वती नाईक. कोरोना संकटाच्या भीतीनं हे दोघेजण गेले अनेक महिने १० बाय १० च्या खोलीबाहेर पडलेले नाहीत. मात्र, घाटकोपरमधल्या दाटीवाटीच्या चाळीत कोरोना कधी येऊन गाठेल याचा नेम नाही. म्हणून  यांनी कोविडची लस घेण्याचा आपल्या मुलाकडे तगादा लावला. लसीचा पहिला डोस झालाही मात्र, दुसरा डोस घेण्याकरता नोंदणी करायला गेले आणि हातात दुसरा डोस घेतल्याचं थेट प्रमाणपत्रच आलं.


वास्ताविक पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस कधी घ्यायचा आणि लसीकरणानंतर काय काळजी घ्यायची याची माहिती देणं तेथील लसीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बंधनकारक आहे. तसंच, लसीकरणानंतर त्रास होऊ नये यासाठी औषधंही दिली जातात. मात्र, महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयातील लसीकरण केंद्रात असं काहीच सांगितलं नाही असं नाईक दांपत्याचं म्हणणं आहे.


नाईक दांपत्यानं  १२ मार्च रोजी कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेतला. दुसरा डोस घेण्यासाठी सुरुवातीला २८ दिवसांचे अंतर ठरवण्यात आले होते. त्यानंतर ते बदलून ४५ दिवस करण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्यांना कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस मिळाल्याचे अधिकृत प्रमाणपत्र मिळाले. याबाबत राजावाडी रुग्णालयात विचारणा केली असता त्यांना आता दुसरा डोस मिळणार नाही असे सांगण्यात आले. कोविन अॅप, राजावाडी रुग्णालय, वॉर्ड ऑफिस सगळीकडे यासंदर्भातील तक्रारी देऊन झाल्या पण, त्यासंदर्भातील उत्तरही आलं नाही आणि लसही मिळाली नाही. 


COVID-19 vaccine Sputnik V: काही दिवसांतच भारताला मिळणार रशियाची स्पुटनिक V लस 


कोरोना संकट गडद होताना दिसत आहे. आरोग्य यंत्रणेवरच्या प्रचंड ताणानं सबंध यंत्रणाच कोलमडण्याच्या बेतात आहे. अशा वेळी लसीकरण हेच कोरोनाला थोपवण्याचं शस्त्रं असू शकतं मात्र, कधी लसीचा साठाच संपतोय तर, कधी लस न घेताच लस मिळाल्याची नोंद होतेय. कोरोनाला थांबवायचं असेल तर यंत्रणेतल्या अशा गोंधळांची रांग रोखलीच पाहिजे.