ठाणे : एखाद्या घटनेच्या मुळाशी जाण्यासाठी किंवा आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी एखादा छोटा पुरावा देखील पोलिसांना पुरेसा असतो. ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली रेल्वे पोलिसांनी एका टॅटूच्या आधारे अपघातातील मृताच्या कुटुंबीयांना शोधलं आहे.


रेल्वे अपघातातील मृत व्यक्तीच्या हातावरील टॅटूच्या मदतीने त्याच्या कुटुंबीयांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलं आहे. डोंबिवलीत एका व्यक्तीचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला होता. त्याच्या हातावर गोंदलेल्या टॅटूमुळे पोलिसांना त्याच्या कुटुंबीयांचा शोध घेण्यात मदत मिळाली.
 
डोंबिवली रेल्वे पोलिसातील अधिकारी संतोष पवार यांनी सांगितलं की, "रेल्वे पोलिसांना 12 एप्रिल रोजी खारबाव आणि कमान स्थानकादरम्यान एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. या व्यक्तीचं वय 30 वर्षांच्या जवळपास होतं. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करुन तपास सुरु केला. तपासादरम्यान त्यांना मृत व्यक्तीच्या खांद्यावर हार्ट शेपमध्ये केपी अक्षरं असलेला टॅटू आढळला."


...आणि मृताची ओळख पटली!
पोलिसांच्या पथकाने जवळपासच्या प्रत्येक परिसरात चौकशी केली. बेपत्ता व्यक्तींची माहिती तपासली. अखेर पेई गावात मृत व्यक्तीच्या कुटुंबाचा पत्ता सापडला. त्यांनी संबंधित टॅटूला दुजोरा दिला. प्रदीप दांडेकर (वय 33 वर्षे) असं मृत व्यक्तीचं नाव असल्याचं समजलं आणि मृतदेह त्याच्या कुटुंबीयांना ताब्यात दिला, असं अधिकाऱ्याने सांगितलं.