मुंबई : मुंबई पूर्व उपनगरातील मुलुंडमध्ये वाहतूक पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या जतीन सतरा याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. काल (15 एप्रिल) रात्री त्याच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. 


पोलिसांना शिवीगाळ करताना त्याने एक जातीचे नाव घेत तुमच्यापेक्षा ते तरी बरे भीक मागून खातात, असं वाक्य उच्चारलं होतं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर रात्री विविध पक्ष, संघटनांचे कार्यकर्ते मुलुंड पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी जातीयवाचक शब्द वापरल्याने जतीनवर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर मुलुंड पोलिसांनी तसा गुन्हा दाखल केला आहे.


दरम्यान आज जतीनला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पोलिसांना शिवीगाळ प्रकरणात त्याला जामीन मंजूर झाला असला तरी मुलुंड पोलीस त्याला पुन्हा अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्याअंतर्गत अटक करतील. त्यामुळे पोलिसांना अरेरावी करणे, शिवीगाळ करणे जतीनला चांगलंच महागात पडलं आहे.


काय घडलं काल?
मुलुंडच्या आरआरटी रोडवर नो पार्किंगमध्ये गाडी उभी करणाऱ्या जतीन सतरा या दुकानदाराने वाहतूक पोलिसांना अर्वाच्य शिवीगाळ केली होती. मुलुंड वाहतूक पोलिसातील ज्ञानेश्वर वाघ आणि गोरख सानप हे  हे आरआरटी रोडवर नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांवर कारवाई करत होते. यावेळी जतीनच्या दुकानासमोर उभी असलेल्या त्याच्या दुचाकीवर त्यांनी कारवाई केली. यामुळे संतापलेल्या जतीनने पोलिसांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यांच्या अंगावर धावून जाऊ लागला. अखेर वाहतूक पोलिसांनी मुलुंड पोलिसांना याची माहिती दिली आणि जतीनला ताब्यात घेतले. 


पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यानंतर मात्र त्याचा नूर पालटला. व्हिडीओच्या माध्यमातून त्याने संबंधित प्रकाराबद्दल पोलिसांची माफीही मागितली. तसंच फ्रण्ट लाईनवर काम करणाऱ्या पोलिसांना सलामही केला.