ठाणे : ठाण्यात पुन्हा एकदिवसय रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. 4 तारखेला एका दिवसात 278 नवीन कोविड रुग्ण पालिकेला आढळले. तर 3 तारखेला एका दिवसात पालिकेने 5 हजार पेक्षा जास्त कोविडच्या चाचण्या करून नवीन विक्रम केला आहे. याआधी पालिकेने एका दिवसात कधीच 5 हजार कोविड चाचण्या केल्या नव्हत्या. त्यामुळे वाढलेल्या चाचण्यांमुळे रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे पालिका आयुक्तांचे म्हणणे आहे.
4 तारखेला ठाणे महानगरपालिका क्षेत्रात नवीन कोविड रुग्णांनी पुन्हा अडीचशेचा टप्पा ओलांडला. एका दिवसात 278 नवीन कोविड रुग्ण पालिका हद्दीत आढळले. यामुळे ठाणे पालिका क्षेत्रात एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 2 हजारांचा आकडा पार करत 2 हजार 307 वर पोचली आहे. तर 122 रुग्ण कोरोना मुक्त होऊन घरी परतले. त्यामुळे एकूण कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांचा आकडा 23 हजार 853 वर पोचला आहे. ठाणे पालिकेत कोरोना रुग्ण बरे होण्याची प्रमाण 88.3% इतके झाले आहे. यासह 4 सप्टेंबरला 2 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृत पावलेल्या रुग्णांची संख्या 853 इतकी झाली आहे.
ठाणे पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, 3 सप्टेंबरला पालिका क्षेत्रात झालेल्या चाचण्यांनी सर्व विक्रम मोडीत काढले. कारण 3 सप्टेंबरला एकच दिवसात 5 हजार 52 कोरोना चाचण्या करण्यात पालिका यशस्वी झाली. गेल्या काही दिवसांपासून ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सुरूवातीस तीन हजारांपेक्षा जास्त आणि त्यानंतर रोज चार हजार चाचण्या करण्याचे उदिष्ट आयुक्तांनी निश्चित केले होते. त्यानुसर प्रत्येक प्रभाग समितीत अँटीजेन आणि आरटीपीसीआर अशा दोन्ही चाचण्या करण्याचे केंद्र सुरु करण्यात आले आहे. त्याला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला असे पालिकेचे म्हणणे आहे. "आम्ही रोज चार हजारांच्यापुढे चाचण्या करीत आहोत. काल आम्ही 5 हजार चाचण्यांचा टप्पा पार केला आहे. गेल्या आठवड्यात काही प्रमाणात रूग्णसंख्या वाढली आहे ही वस्तुस्थिती आहे. पण गणेशोत्सवामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेर पडले होते. त्याचबरोबर आम्ही चाचण्यांची संख्याही वाढविली आहे. त्यामुळे थोडीफार रूग्णसंख्या वाढली आहे. पण त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. महापालिका प्रशासन याबाबत सतर्क असून कोणत्याही परिस्थितीशी सामना करण्यास महापालिका सक्षम आहे", असे पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी सांगितले.
त्यामुळे वाढलेल्या रुग्ण संख्येचे कारण, वाढलेल्या चाचण्या आहेत असे पालिकेचे म्हणणे आहे. तसेच रुग्ण संख्या नियंत्रणात असल्याचा दावा देखील पालिकेने केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
मिशन बिगीन अगेनचा गैरफायदा, ठाण्यात रुग्णसंख्या पुन्हा वाढली
कोरोना काळात पावसाळी अधिवेशनाच्या गर्दीचं शासनापुढे आव्हान