ठाणे : ठाण्यात गेल्या काही दिवसात रूग्ण संख्येत पुन्हा वाढ झालेली दिसून येत आहे. गणपती आधी आटोक्यात आलेली रुग्णसंख्या आता पुन्हा एकदा वाढत जात आहे. नियमात शिथिलता दिल्याने नागरिक बेफिकीर होऊन रुग्ण संख्येत वाढ होते आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. येत्या काही दिवसात ठाण्यात रुग्ण संख्येचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Continues below advertisement

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात जून आणि जुलै या महिन्यात कोरोनाचा उद्रेक बघायला मिळाला होता. रोज नवीन सापडणाऱ्या रुग्णांचा आकडा साडेचारशेचा टप्पा ओलांडत होता. त्यामुळे मिशन बिगीन अगेन बंद करून ठाणे पालिका आयुक्तांनी लॉकडाऊन जाहीर केले. अठरा दिवसांच्या लॉकडाऊन नंतर ठाण्यामध्ये रुग्ण संख्येत घट होताना दिसून आली होती. साडेचारशे असणारी रुग्णसख्या सुरुवातीला 300 च्या आत आणि नंतर 200 च्या आत आली होती. गेल्याच आठवड्यात 125 पर्यंत रुग्ण संख्या पोचली. मात्र, त्यानंतर अचानक रुग्ण संख्येत पुन्हा वाढ दिसून आली.

गेल्या काही दिवसांतील दरदिवशी आढळणाऱ्या रुग्णांची आकडेवारी गुरुवार 3 सप्टेंबर 329 बुधवार 2 सप्टेंबर - 273 मंगळवार 1 सप्टेंबर - 224 सोमवार 31 ऑगस्ट 188 रविवार 30 ऑगस्ट 208 शनिवार 29 ऑगस्ट 240 शुक्रवार 28 ऑगस्ट 197 गुरुवार 27 ऑगस्ट 170 बुधवार 26 ऑगस्ट 193 मंगळवार 25 ऑगस्ट 129 सोमवार 24 ऑगस्ट 125

Continues below advertisement

या रुग्णवाढी मागे अनेक कारणे आहेत. ऑगस्ट महिन्यात अनेक नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली. गणपती असल्याकारणाने बाजारपेठा सुरू करण्यात आल्या. दुकानांचे पी वन आणि पी टू असलेले नियम बंद करुन सर्व दुकाने खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडले. त्यावेळी सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवले गेले. तसेच ऑगस्ट महिन्यात शेवटच्या दिवसांमध्ये राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणावरुन येणारे तसेच रेल्वेने परराज्यातून येणारे प्रवासी वाढले. त्यामुळे देखील रुग्ण संख्या वाढल्याचे बोलले जात आहे. यासाठी महापालिका मात्र वेगळे कारण देत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवायचा असेल तर ऑफिसेसच्या वेळा बदला, उपनगरीय प्रवाशी संघाची ठाकरे सरकारकडे मागणी

"महापालिकेने अँटीजेन टेस्ट वाढवल्या आहेत. सोबत आर टी पीसीआर टेस्ट देखील वाढवल्या आहेत. आता दिवसाला 4 हजार कोरोना टेस्ट आम्ही करत आहोत. त्यामुळे जास्त रुग्ण सापडत आहेत", असे पालिका उपायुक्त संदीप माळवी म्हणाले. यासोबत त्यांनी ठाणेकरांना आवाहन देखील केले आहे. "कोरोना कमी झालेला आहे मात्र संपला नाहीय, त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना पूर्णतः काळजी घेणे आवश्यक आहे, सर्व नियम पाळले तरच आपण कोरोनापासून वाचू शकू", असे ते म्हणाले.

टेस्ट वाढल्या असल्या तरी पर्यायाने रुग्ण संख्या कमी होणे अपेक्षित होते. त्यातही जी रुग्णसंख्या आटोक्यात आली होती, ती रुग्णसंख्या पुन्हा वाढणे याचा अर्थ मिशन बिगीन अगेनचा नागरिक गैरफायदा घेत असल्याचे दिसून येत आहे. ठाणे शहरात आता मोजक्या गोष्टी सोडल्या तर सर्वच व्यवहार पूर्ववत सुरू झाले आहेत. नागरिकांमधील कोरोनाची भीती देखील हळूहळू कमी होत आहे. मात्र असे असताना कोरोना पूर्णतः संपला या अविर्भावात वागणे चुकीचे आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रुग्ण संख्येचा उद्रेक होऊ शकतो.

Unlock 4 | ठाणे, नवी मुबंईतील मॉल्स सुरु, कोरोनामुळे मॉलसाठी वेगळी नियमावली