मुंबई : लोकलमधील गर्दी कमी व्हावी तसेच दिवसेंदिवस वाढत जाणारा कोरोना व्हायरसचा त्रास कमी व्हावा यासाठी मुंबईतील ऑफिसेसच्या वेळांमध्ये बदल करण्यात यावा, अशी मागणी उपनगरीय प्रवाशी वाहतूक संघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. सध्या सर्वसामान्यांना लोकलने प्रवास करता येतं नाही. परंतु, लवकरच सर्वांसाठी लोकल सेवा सुरू झाल्यास पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे लोकल सुरू करण्यापूर्वी प्रशासनाने मुंबईतील ऑफीसेसच्या वेळा बदलाव्यात. यामुळे अपोअपच गर्दी कमी होण्यास मदत होईल आणि कोरोनाचा वाढत जाणारा प्रादुर्भाव थांबेल.


यासोबतच ऑफिसच्या वेळा गाठण्यासाठी नोकरदारांची होणारी दमछाक देखील थांबेल, अशी प्रतिक्रिया रेल्वे प्रवासी संघाचे माजी अध्यक्ष मनोहर शेलार यांनी दिली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पत्रव्यवहार देखील केला आहे. जर मागणी मान्य नाही झाली तर निर्माण होणाऱ्या परिस्थितीला प्रशासन जबाबदार असेल असं देखील मनोहर शेलार यांनी म्हंटल आहे. मागणी मान्य न झाल्यास आम्ही मंत्रालयासमोर घंटा नाद आंदोलन करू आसा इशारा संघाने दिला आहे.


मुख्यमंत्र्यांकडून आता मिशन 'पुणे विभाग'; सातारा, सांगली, कोल्हापूर येथील कोविड उपाययोजनांचा आढावा


तर पुन्हा मुंबईत कोरोनाचा प्रकोप होईल
याबाबत अधिक बोलताना उपनगरीय रेल्वे प्रवाशी संघांचे माजी अध्यक्ष मनोहर शेलार म्हणाले की, सध्या कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे अनेक प्रवाशी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर न करता स्वतःच्या गाड्यांचा वापर करत आहेत. त्यामुळे मुंबईकरांना दररोज वाहतुकीच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. काही दिवसांत लवकरच सर्वांसाठी लोकल सेवा मुंबईत सुरू होईल. एकदा लोकल सेवा सुरू झाली की मुंबईसह उपनगरातील सर्व नागरिक लोकलने प्रवास करण्यास सुरुवात करतील. परिणामी पुन्हा लोकलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. अशा परिस्थितीत कोरोनापासून वाचण्यासाठी सोशल डीस्टनस राखणं अवघड होऊन जाणार आहे. परिणामी पुन्हा कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या पुन्हा एकदा मुंबईत मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकरे सरकारने आत्ताच मुंबईतील ऑफिसेसच्या वेळा बदलणे गरजेचे आहे.


यामुळे आपोआपच ऑफिसेसची ठराविक वेळ गाठण्यासाठी जी नोकरदारांची दमछाक होते ती कमी होईल. सोबतच लोकलमध्ये ठराविक वेळी होणारी गर्दी देखील कमी होईल. यामुळे नागरिकांना व्यवस्थित आणि सुरक्षित प्रवास करता येईल. यासोबतच कोरोना व्हायरस पासून वाचण्यासाठी ठराविक अंतर राखणे देखील प्रवाशांना सोप्प होईल. त्यामुळे ठाकरे सरकारने याबाबत वेळीच विचार करून मुंबईतील विविध ऑफिसेसला सूचना द्याव्यात. महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेसाठी ना कसला यंत्रणेवर ताण येणार आहे ना सरकारला यावर कसला आर्थिक खर्च येणार आहे. यामुळे आपोआपचं रस्त्यावर होणारी वाहतूक समस्या देखील सुटणार आहे.


'कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवायचा असेल तर कार्यालयांच्या वेळा बदला' प्रवाशी संघाची मागणी