नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. त्याच धर्तीवर केंद्र सरकारकडून एप्रिल महिन्यासाठी एक नव्या मार्गदर्शक सूचना आणि नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये ट्रेस, ट्रॅक आणि ट्रीट या त्रिसूत्रीचा वापर करण्यात येणार आहे. सोबरत लसीकरणावरही भर देण्यात येणार आहे. ज्या राज्यांमध्ये आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या कमी आहे, तेथे चाचण्यांची संख्या वाढवण्याचे आदेश केंद्राकडून देण्यात आले आहेत. 


कोरोनाबाधिताची माहिती मिळताच तातडीनं रुग्णावर उपचार करण्यात येऊन रुग्णावर लक्ष देण्यात यावं. रुग्णाचे संपर्क शोधून अशा व्यक्तींना विलगीकरणात ठेवावं. कंटेन्मेंट झोन अर्थात प्रतिबंधित क्षेत्रांबाबतीची माहिती जिल्ह्याच्या संकेतस्थळावरून सर्वांपर्यंत पोहोचवावी असंही केंद्रानं या नव्या नियमावलीत म्हटलं आहे.


नियमावलीमध्य मास्क न वापरणं आणि कोरोनासाठी आखून दिलेल्या प्रतिबंधात्मक नियमांचं पालन न करणाऱ्यांवर कारवाई करत दंडवसूली करण्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. शिवाय ही बाबही स्पष्ट करण्यात आली आहे, की इतर राज्यांमध्ये सुरु असणाऱ्या वाहतुकीवर कोणत्याही प्रकारचे निर्बंध तूर्तास लावले जाऊ नयेत. 


covid-19 vaccination India | 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोविड लस देण्याची मागणी मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांकडून केंद्राचे आभार 


लसीकरणाचा वेग कमी असणाऱ्या राज्यांबाबतही केंद्रानं चिंता व्यक्त केली असून, लसीकरण प्रक्रियेला गती देण्याला सल्ला दिला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यांवर केंद्राकडून प्रकाश टाकण्यात आला आहे. 


महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, छत्तीसगढ, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या अतिशय झपाट्यानं वाढत आहे. देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी मागील 24 तासांच आढळून आलेली तब्बल 81 टक्के रुग्णसंख्या याच 6 राज्यांतून आहे. देशात कोरोनाची सद्यस्थिती पाहता नागरिकांच्या सतर्कतेनं आणि पूर्ण सहकार्यानंच या विषाणूवर मात मिळवता येणं शक्य होणार आहे.