मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरातील कोरोना बाधितांची संख्या कमी होत असून ऐन दिवाळीत ही संख्या दोन आकड्यांवर आली आहे. नवीन कोरोना बधितांचे प्रमाणही आता सर्वात कमी 8.39 टक्क्यावर आले असून त्याउलट डिस्चार्ज दर हा सर्वाधिक 95 टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान कोवीड 19 आटोक्यात आला तरीही नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी केले आहे.


गेल्या अनेक महिन्यांपासून ठाणे शहरातील covid-19 च्या रुग्णांची संख्या ही तीन आकडी होती. तिची सरासरी 150 इतकी होती. मात्र ऐन दिवाळीच्या काळात गेल्या दोन दिवसांपासून ही संख्या दोन आकड्यात येत आहे. 15 नोव्हेंबर रोजी गेल्या अनेक महिन्यांतील सर्वात निचांकी रुग्ण संख्या निदर्शनास आली. 6 हजार संशयितांच्या चाचण्यापैकी केवळ 77 जणांना covid-19 ची बाधा झाल्याचे रिपोर्टमध्ये आढळले. हा आकडा गेल्या अनेक महिन्यातील रुग्ण संख्येचा नीचांकी आकडा आहे. तर आज 16 नोव्हेंबर रोजी 95 नागरिकांना covid-19 ची बाधा झाल्याचे समोर आले आहे.


एकीकडे रुग्ण संख्या कमी होत असली तरी ठाणे महानगरपालिकेने आपल्या चाचण्यांमध्ये वाढ केली आहे. कोवीड 19 ची साथ नियंत्रणात असतानाही महापालिका दररोज सरासरी 5500 ते 6000 पर्यंत चाचण्या करीत आहे. 16 नोव्हेंबरपर्यंत साधारणत: 5 लाख 77 हजार 257 इतक्या चाचण्या महानगरपालिकेने केल्या आहेत. त्यामुळे योग्यवेळी बाधित व्यक्तींवर उपचार करणे सोयीचे झाले आहे. सद्यस्थितीत ठाणे शहराचा मृत्यूदरही कमी होत असून तो आता 2.31 इतका झाला आहे तर कोरोना मुक्त रूग्णांचे प्रमाण हे जवळपास 95 टक्क्यावर पोहोचले आहे.


महापालिकेच्यावतीने कोवीड 19 ला नियंत्रणात ठेवण्यासाठी कठोर उपाययजना करण्यात आल्या असून नागरिकांनी ही साथ नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी केले आहे. नागरिकांनी अनावश्यक कारणासाठी घराबाहेर पडू नये असे आवाहन करतानाच कामासाठी बाहेर पडायचे झाल्यास विना मास्क बाहेर पडू नये, योग्य अंतर ठेवावे आणि सॅनिटायझरचा वारंवार वापर करावा असे आवाहन महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी केले आहे.


CoronaVirus | कोरोनाच्या संकटात 'जीवघेणी गर्दी'! खरेदी करताना 'कोरोना' विकत घेऊ नका!