मुंबई: चक्क एका पोलिसानेच कायदा हातात घेत, बांधकाम व्यवसायातील भागीदारीची हत्या केली आहे. मीरा रोडजवळच्या काशिमीरा परिसरात हा प्रकार घडला.


मुश्ताक अब्दुल मुलानी असं हत्या करणाऱ्या पोलिसाचं नाव असून, तो कांदिवली पोलीस ठाण्यात नाईक पदावर कार्यरत होता.

मुश्ताक मुलानी आणि त्याचा भाऊ मुनीर यांनी मुस्तफा नजीर शेख उर्फ बबलूची अपहरण करुन हत्या केल्याचा आरोप आहे. या आरोपाखाली काशिमीरा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

पोलीस असलेला मुलानी आणि मुस्तफा यांच्यात बांधकाम व्यवसायात भागीदारी होती. मुलानीने मुस्तफाला काही पैसे उधार दिले होते. ते पैसे परत मिळत नसल्याने मुलानी आणि त्याच्या भावाने मुस्तफाचे अपहरण केलं आणि त्याच्या पत्नीला पैसे आणण्यास सांगितले. त्याच्या पत्नीने याची माहिती पोलिसांना दिली.

परंतु तोपर्यंत दोघा भावांनी मुस्तफाला बेदम मारहाण केली होती. यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता. आरोपींनी मुस्तफाचा मृतदेह घोडबंदर रोड ते वर्सोवा दरम्यान एका कच्च्या रस्त्यावर फेकून दिला होता. हा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी मुलानी आणि त्याच्या भावाला अटक केली.

या दोघांनाही 8 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, दोघांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचं सांगण्यात येत आहे.