मुंबई: जनसंघर्ष यात्रेच्या पहिल्या टप्प्यानंतर काँग्रेसने आता निवडणूक तयारीला सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकांना सुरुवात झाली आहे. काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घरी, काल (मंगळवारी) रात्री काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली.  या बैठकीला काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, संजय निरुपम,  तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.


2019 च्या निवडणुकीच्या निमित्ताने जागा वाटपावरुन दोन्ही पक्षात चर्चा झाली. समविचारी पक्षांना एकत्र घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादीसह महाआघाडी बनवण्याचं निश्चित झालं. या बैठकीत सत्ताधारी भाजप-शिवसेनेविरोधात आघाडी करण्याचा निर्णय झाला. जागा वाटपाबाबत पहिल्यांदाच बैठक घेऊन चर्चा झाली.



काही जागांवर मतभेद

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्यावर दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते चर्चा करायला बसले खरे, पण दोन्ही पक्षातील नेत्यांत काही जागांवर मतभेद असल्याचंही समोर आलं.

भविष्यात दोन्ही पक्ष कोणत्या जागा लढवणार, महाआघाडीतील घटक पक्षांना कोणत्या जागा द्यायच्या हे अंतिम करुन, पुढे वादाच्या जागांवर चर्चा करण्याचं ठरलं.

पुढील तीन चार दिवसात सपा, बहुजन विकास आघाडी, बसपा यासह काही पक्षांसमवेत चर्चा करुन लोकसभा, विधानसभा जागा दिल्या जातील असे समजते.

या बैठकीत राष्ट्रवादीने 50 टक्के जागा मागणीवर एक चकार शब्दही काढला नाही.

वादग्रस्त जागांवर तूर्तास चर्चा नकोच, बाकी जागांवर चर्चा करण्यावर दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये एकमत झालं. वादग्रस्त विषय न काढण्याच्या सूचक सूचनाही बैठकीत दिल्याचं समजते. सरकारविरोधात एकत्रित यावे असा सूर लावत काँग्रेसने राष्ट्रवादीच्या नेत्यांना चिमटेही या बैठकीत काढल्याचं सांगण्यात येतं.