सांगली : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष आमदार नरेंद्र पाटील काल सांगली दौऱ्यावर असताना, त्यांनी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांची भेट घेतली. या भेटीचे वैशिष्ट्य म्हणजे ही भेट कुठल्या बंद खोलीत वगैरे नाही, तर एसटीमध्ये झाली.


आमदार नरेंद्र पाटील काल सांगली दौऱ्यावर होते. त्याची संभाजी भिडे यांच्या भेटीची वेळही ठरली होती. मात्र भिडेंना भेटण्यासाठी जाण्यास पाटील यांना थोडा उशीर झाला. तोवर भिडे आपल्या नियोजित दौरा आणि वेळेनुसार सांगली बसस्थानकतून सांगली-जत बसमधून जतकडे निघाले. त्यानंतर पाटील यांनी शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितिन चौगुले यांच्याशी संपर्क साधत आपण भिडे गुरुजींना भेटण्यासाठी नियोजित ठिकाणी पोहोचत असल्याचे सांगितले. मात्र त्यवेळी चौगुले यांनी संभाजी भिडे बसमधून बाहेरगावी निघाले असल्याचे सांगितले.

तेव्हा नरेंद्र पाटील यांनी कोणत्या मार्गाने आणि कोणत्या बसमधून जात असल्याची विचारणा केल्यानंतर  सांगली-मिरज रस्त्यावरून जाणाऱ्या या बसचा क्रमांक घेऊन कर्मवीर भाऊराव पाटील चौकात बस थांबविण्याची  विनंती पाटील यांनी चालकाला केली.

चालकानेही शासकीय वाहनांचा ताफा व नरेंद्र पाटील यांच्या विनंतीवरून बस थांबविली. तेव्हा नरेंद्र पाटील यांनी भिडे यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ दिले. अण्णासाहेब पाटील महामंडळावर निवड झाल्याबद्दल भिडे यांनी नरेंद्र पाटील यांचे अभिनंदनही केले.

जवळपास दहा मिनिटांच्या या भेटीनंतर आमदार पाटील यांनी प्रवाशांची दिलगिरी व्यक्त करत संभाजी भिडे याचा निरोप घेतला. यावेळी पाटील यांनी एसटीतील चालक व वाहकांचे देखील आभार मानले. एसटीमधील प्रवाशांनीही बस थांबवून झालेल्या भेटीबाबत आणि त्यामुळे ताटकळत राहिल्याबद्दल कोणतीही तक्रार केली नाही.