मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मिरसोबत केल्यानंतर सोशल मीडियात कंगनाविरोधात टीकेची झोड उठली आहे. अशातच कंगनाची पाठराखण करणाऱ्या भाजप नेते राम कदम यांच्यावर निशाणा साधत त्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच राम कदम यांच्यावर निशाणा साधताना काँग्रेसने विवेक मोईत्राचीही आठवण करून दिली आहे.


काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमधून त्यांनी भाजप नेते राम कदम यांच्या नार्को टेस्टची मागणी केली आहे. तसेच सचिन सावंत यांनी आवर्जुन विवेक मोईत्रा यांचाही उल्लेख केला आहे. तसेच कंगनाला भाजपच्या आयटीसेलची साथ आहे. हे मिळून भाजप घाणेरडं राजकारण करत असल्याचा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.


सचिन सावंत यांचे ट्वीट :


सचिन सावंत यांनी ट्वीटमध्ये कंगना आणि राम कदम टॅग करत म्हटलं आहे की, '@KanganaTeam म्हणजे "कंगना+भाजप IT सेल" कंगनाच्या ट्वीट, वक्तव्यांमागे भाजप आहे. या कृतघ्न महिलेच्या साथीने @ramkadam यांनी महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेचा, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील १०६ हुतात्म्यांचा, राणी लक्ष्मीबाईंचा व #आमचीमुंबई वर प्रेम करणाऱ्या सर्वांचा घोर अपमान केला आहे.'





सचिन सावंत विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागा अशी मागणी केली आहे. 'महाराष्ट्र ही शिवरायांची भूमी आहे. महाराष्ट्राचा सातत्याने जाणिवपूर्वक अपमान भाजप करत आहे. अजूनही भाजपाने कंगनाचा निषेध केला नाही. कंगना व राम कदम यांचे बोलविते धनी असलेल्या @Dev_Fadnavisआणि महाराष्ट्रद्रोही भाजपने विनाशर्त महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी ही आमची मागणी आहे.' , असं सचिन सावंत यांनी ट्वीट केलं आहे.





सचिन सावंत यांनी आपल्या ट्वीटमध्ये आवर्जुन विवेक मोईत्रा यांचाही उल्लेख केला आहे. विवेक मोईत्रा यांचा याआधी ड्रग्जसंदर्भात उल्लेख आला होता. परंतु, ती गोष्ट राहुल महाजन यांच्या संदर्भात होती. राहुल महाजन आणि राम कदम हे मित्र होते. त्यामुळे या ट्वीटमध्ये सचिन सावंत यांनी आवर्जुन विवेक मोईत्रा यांचा उल्लेख केला असल्याचं बोललं जात आहे. यासंदर्भात ट्वीट करताना सचिन सावंत म्हणाले की, 'विवेक मोईत्रा यांच्यापासून राम कदम यांना ड्रग विक्री पुरवठ्याबाबत माहिती आहे. त्यांचे बॉलिवूड संबंधही घनिष्ठ आहेत. त्यामुळे त्यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी आम्ही करत आहोत.भाजपा कार्यालयात 53 वेळा फोन करून संदीप सिंग कोणाशी बोलत होता व भाजपाचे ड्रग माफिया संबंध ही उघड होतील.'





या क्षणाला सांगाल त्या ठिकाणी मी यायला तयार आहे : राम कदम 


सचिन सावंत यांच्या ट्वीटला उत्तर देत राम कदम यांनी ट्वीट केलं आहे. राम कदम ट्वीटमध्ये म्हणाले की, 'छत्रपती शिवरायांना मानणारा मी मावळा आहे उद्या नव्हे ,या क्षणाला सांगाल त्या ठिकाणी मी यायला तयार आहे मी व माझ्या संपूर्ण कुटुंबाची नार्को टेस्ट करावी. तयार आहे पण मात्र या प्रकरणात अडकलेले तुमच्या सरकारचे बडे नेते , मंत्री नार्को टेस्ट करायाला तयार आहेत का ? ते तपासून पहा.'


ड्रग्ज कनेक्शन आणि बॉलिवूडसंदर्भात राम कदम यांना अधिक माहिती : सचिन सावंत


'ड्रग्ज कनेक्शनसंबंधी राम कदम एवढं बोलत आहे. खऱ्या अर्थाने ड्रग्ज कनेक्शन आणि बॉलिवूडसंदर्भात अधिक माहिती असणारी व्यक्ती राम कदमच आहे. त्यांचे बॉलिवूडशी संबंध आहेतच. पण ड्रग्जसंदर्भात त्यांचा जो अनुभव किंवा त्यासंदर्भातील माहिती आहे, ती फार वर्षांपूर्वीपासूनच आहे. विवेक मोईत्रांचा याप्रकरणात मृत्यू झाला होता. हे सगळे त्यांच्या क्लोज सर्किटमधीलच व्यक्ती होत्या. त्यामुळे मला असं वाटतं त्यांची नार्को टेस्ट केल्यावर दोन गोष्टी उघड होतील. एक म्हणजे ड्रग कनेक्शन कधीपासूनचं आहे, आणि कोण-कोण यात सहभागी होतं, हे समजेल. दुसरीकडे तो संदीप सिंह आहे, ज्याने 53 फोन केले भाजप कार्यालयात. त्याचीही माहिती ते देऊ शकतील' , असं सचिन सावंत एबीपी माझाशी बोलताना म्हणाले.


नार्को नाही पाहिजे ती टेस्ट करा : राम कदम


'यामध्ये दोन गोष्टी आहेत, सुशांत सिंह राजपूतच्या प्रकरणाला आज 84 ते 85 दिवस पूर्ण झाले. पण याप्रकरणी महाराष्ट्र सरकार कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत होतं, त्यामुळे संपूर्ण देशात आणि जगभरात महाराष्ट्र सरकारची छी-थू झाली. एवढं झाल्यावर यांच्याकडे पर्याय उरतो की, ज्या व्यक्ती आक्रमकपणे सरकारवर टीका करतायत, सरकारच्या चुका देशासमोर मांडतायत, त्यांना बदनाम करणं, हाच प्रकार माझ्यासोबत सुरु आहे. नार्को टेस्ट उद्या नाही आता यायला तयार आहे. कुठे यायचं सांगा. आव्हान आहे माझं जाहीरपणे, नार्को नाही पाहिजे ती टेस्ट करा. पण हे करताना महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागा.' सचिन सावंत यांच्या ट्वीटनंतर राम कदम यांनी एबीपी माझाशी बोलताना ही प्रतिक्रीया दिली.


कंगनाच्या मुंबईबाबतच्या वक्तव्यानंतर राम कदम आणि सचिन सावंत यांच्यातील ट्वीट युद्ध


कंगना झाशीची राणी... राम कदम


कंगनाने मुंबईत का येऊ नये? महाराष्ट्र सरकारला कशाची भीती वाटते. जर ती स्वतः पुढे बॉलीवूड मधील ड्रग माफिया, राजकारणी, अभिनेता यांची नावे सांगण्याचं घाडस कंगना दाखवत आहे. याविषयी कंगनाचे कौतुक न करता कंगनाला धमकावण्याचे प्रयत्न केले जात आहे. वास्तवात महाराष्ट्र सरकार कंगनाला घाबरत आहे. कारण तिने नाव सांगितली तर सर्वांची नावे देशासमोर येतील. त्यामुळे तिला धमकावलं जात आहे. मात्र, राज्य सरकार हे विसरत आहे की संपूर्ण देश कंगनाच्या पाठीमागे उभा आहे. कंगना झाशीची राणी आहे, ती अशा धमक्यांना घाबरणार नाही.





काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची टीका


कंगना रणौत आणि तिला पाठिंबा देणाऱ्या भाजप आमदार राम कदम यांचा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी समाचार घेतला आहे. "ज्या मुंबईने राहयला घर, खायला अन्न दिलं त्याची तुलना पाकव्याप्त काश्मीरबरोबर करणाऱ्या वक्तव्याचा मी निषेध करतो. अशा स्त्रीचा निषेध करण्याऐवजी तिची तुलना भाजप आमदार झाशीच्या राणीशी करत आहेत."


महत्त्वाच्या बातम्या : 


कंगना रानौतकडून मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरबरोबर; सोशल मीडियावर संताप


'उचलली जीभ, लावली टाळ्याला', रेणुका शहाणेंचा कंगनावर संताप, तर कंगना म्हणते...