मुंबई : 'मिशन शक्ती'ची सुरुवात यूपीए सरकारच्या काळात झाली असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री आणि अंतरिक्ष आयोगाचे माजी सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. आम्ही हे मिसाईल 2012 मध्ये तयार केलं होतं. फक्त त्याची चाचणी करायची का नाही हा राजकीय निर्णय होता. आम्ही तो निर्णय घेतला नव्हता. आमचा आमच्या मिसाईलवर विश्वास होता म्हणून आम्ही मिसाईलची चाचणी केली नव्हती, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.


VIDEO | निवडणुकीच्या तोंडावर घोषणा का केली? मोदींच्या घोषणेनंतर पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल | मुंबई | एबीपी माझा


पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले की, मी अंतरिक्ष आयोगाचा सदस्य सहा वर्ष काम केलं आहे. आजची ऐतिहासिक घटना आहे. यासाठी निश्चितच शास्त्रज्ञांचे अभिनंदन करायला पाहिजे. मात्र निवडणुकीच्या तोंडावर का घोषणा केली किंवा पंतप्रधानांनी ही घोषणा करावी का? हा प्रश्न आहे, असे ते म्हणाले.

राहुल गांधींनी मोठी घोषणा केली होती त्याविरोधात काही घोषणा करणार का? असे प्रश्न होते. पंतप्रधान राष्ट्रीय सुरक्षा बाबत बैठक घेतली म्हणून पाकिस्तान, दाऊद, मसूद याबाबत घोषणा असेल असे वाटले होते पण वेगळी घोषणा झाली, असे ते म्हणाले. या कारवाईचे स्वागत आहे, यासाठी निश्चितच शास्त्रज्ञांचे अभिनंदन आहे, असे ते म्हणाले.

गेल्या महिन्यात सॅटेलाईट अंतराळात सोडला असणार. नंतर मिसाईल टेस्ट ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केल्याचं दिसतं आहे, असे ते म्हणाले.

अंतराळात भारताचा सर्जिकल स्ट्राईक, 3 मिनिटात सॅटेलाईटचा वेध : पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (27 मार्च) देशाला संबोधित केलं. देशाला उद्देशून केलेल्या या भाषणात पंतप्रधान मोदींनी डीआरडीओने अंतराळात केलेल्या कामगिरीची माहिती दिली.

"भारताने आज आपलं नाव अंतराळ महाशक्ती म्हणून नोंदवलं आहे. भारताने A-SAT क्षेपणास्त्राच्या मदतीने लो अर्थ ऑर्बिटमध्ये (LEO) एका लाईव्ह सॅटेलाईटचा अवघ्या तीन मिनिटात वेध घेतला. अंतराळातही युद्ध सज्जता असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. ही कामगिरी करणारा भारत हा अमेरिका, रशिया आणि चीननंतर हा चौथा देश ठरला आहे, असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.

अवघ्या तीन मिनिटांत ऑपरेशन पूर्ण : नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदी  म्हणाले की, "काही वेळापूर्वीच आपल्या वैज्ञानिकांनी 300 किलोमीटर अंतरावर 'लो अर्थ ऑर्बिट'मध्ये एका सॅटेलाईटचा वेध घेतला. हे ऑपरेशन अवघ्या तीन मिनिटांतच पूर्ण झालं. 'मिशन शक्ती' नावाचं हे ऑपरेशन अतिशय कठीण होतं, ज्यात उच्च दर्जाची तांत्रिक क्षमतेची आवश्यकता होती."

"कोणत्याही देशाचं नुकसान करण्याचा भारताचा इरादा नाही, हे संरक्षणात्मक पाऊल आहे. आमच्या मोहीमेमुळे कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायद्याचं, तहाचं किंवा करारांचं उल्लंघन झालेलं नाही. आमचा प्रयत्न शांतता ठेवण्याचा आहे, युद्धजन्य परिस्थिती निर्माण करण्याचा नाही," असंही त्यांनी स्पष्ट केलं.

देशाची मान उंचावणाऱ्या वैज्ञानिकांचा अभिमान : मोदी
आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी वैज्ञानिकांचं कौतुक केलं. सर्व भारतीयांसाठी ही अभिमानाची बाब आहे. ही कामगिरी भारतीय बनवटीच्याच A-SAT या क्षेपणास्त्राद्वारे केली. या अभियानाशी संबंधित सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज त्यांनी पुन्हा एकदा देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. आम्हाला देशाच्या वैज्ञानिकांचा अभिमान आहे. आपल्या उपग्रहांचा फायदा सगळ्यांनाच मिळतो. येत्या काळात त्यांचा वापर आणि महत्त्व वाढणार आहे. अशा परिस्थितीत सुरक्षाही अतिशय महत्त्वपूर्ण आहे.