मुंबई : ईशान्य मुंबईच्या जागेसाठीच्या शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. किरीट सोमय्या ईशान्य मुंबईचे विद्यमान खासदार आहेत. मात्र शिवसेनेने किरीट सोमय्यांऐवजी भाजपचे नेते मनोज कोटकांचा विचार करावा, असा सूचक सल्ला मुंबई महापालिकेतील शिवसेना नेत्यांनी दिला आहे.


मुंबई महापालिकेच्या कारभारावरुन किरीट सोमय्यांनी शिवसेना नगरसेविका किशोरी पेडणेकर यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर किशोरी पेडणेकर यांनीही सोमय्यांवर टीका केली होती. सोमय्या आणि पेडणेकर यांच्यातील सामना अजूनही शिवसैनिकांच्या लक्षात आहे. तेच लक्षात ठेवून आता महापालिकेतील सक्षम नेत्यांचा भाजपने विचार करायला हवा, असा सल्ला महापालिकेतील शिवसेना नेत्यांनी दिला आहे.



किरीट सोमय्यांनी केलेली टीका शिवसैनिक विसरलेले नाहीत : राहुल शेवाळे


सोमय्यांच्या डोक्यावरील टांगती तलवार कायम, फडणवीस-उद्धव ठाकरेंच्या बैठकीतही तोडगा नाही


भाजपने किरीट सोमय्यांऐवजी मनोज कोटकांना तिकीट दिलं तर शिवसैनिक त्यांच्या पाठिशीच उभा असेल, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. मात्र किरीट सोमय्यांना उमेदवारी दिली तर शिवसेना भाजपला सहकार्य करणार नाही का? प्रश्न उपस्थित होत आहे.


प्रवीण छेडा उद्धव ठाकरेंच्या भेटीला


दुसरीकडे ईशान्य मुंबईच्या जागेसाठी इच्छुकांचं मातोश्रीवर लॉबिंग सुरु झालं आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या प्रवीण छेडा यांनी आज उद्धव ठाकरेंची सदिच्छा भेट घेतली. ईशान्य मुंबईतून भाजपकडून मनोज कोटक, पराग शाह, प्रकाश मेहता आणि प्रविण छेडा यांची नावं चर्चेत आहेत. कालच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला मुख्यमंत्र्यांसमोर विरोध केला होता. त्यानंतरच्या प्रविण छेडांच्या मातोश्री वारीने ईशान्य मुंबईच्या उमेदवारीची चुरस वाढली आहे.