मुंबई : विधीमंडळाचे पक्षनेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. यो दोन्ही नेत्यांमध्ये शरद पवारांचं मुंबईतील निवासस्थान सिल्वर ओक येथे चर्चा झाली. भेटीदरम्यान, दोन्ही नेत्यांमध्ये महामंडळ वाटपावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. तीन पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेलं महाविकास आघाडी सरकार सत्तेत येऊन वर्ष लोटलं तरी महामंडळ प्राधिकरण आणि समित्यांचं वाटप प्रलंबित आहे. त्यामुळे आता येत्या पंधरा दिवसांत महामंडळांचं वाटप होईल, तसेच त्यासंदर्भातील चित्रही स्पष्ट होईल, अशी माहिती मिळत आहे. तिनही पक्षांमध्ये महामंडळांचं समसमान वाटप होत असल्यानं त्यातही चुरस दिसून येत आहे. त्यामुळे बाळासाहेब थोरात आणि शरद पवार यांच्या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. तसेच या भेटीनंतर राजकीय वर्तुळातही चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. 


काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांच्यावर दोन शस्त्रक्रिया झाल्या होत्या. आजारपणातून बाहेर पडल्यानंतर शरद पवार पुन्हा एकदा कामाला लागले आहेत. तेव्हापासून राज्यातील अनेक नेते शरद पवारांच्या भेटीला येत आहेत. यापूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यापाठोपाठ भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीत प्रवेश करणारे एकनाथ खडसेही शरद पवारांच्या भेटीला गेले होते. शरद पवारांसोबतच्या या भेटींमुळे राज्याच्या राजकारणात अनेक चर्चा रंगल्याचं दिसून आलं होतं. 


शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट


काही दिवासांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही शरद पवारांची भेट घेतली होती. मुंबईतील 'सिल्वर ओक' या शरद पवार यांच्या निवासस्थानी ही भेट झाली होती. ही सदिच्छा भेट असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं. या भेटीची माहिती त्यांनी स्वत: ट्वीट करुन दिली होती. परंतु महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती पाहता या दोन दिग्गज नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं होतं.  


देवेंद्र फडणवीसांपाठोपाठ एकनाथ खडसे शरद पवारांच्या भेटीला 


भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या एकनाथ खडसेंनी शरद पवार यांची भेट घेतली होती. काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यावरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. अशातच देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ आता एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :