कल्याण : डोंबिवली आणि ठाकुर्ली परिसरात मागील काही दिवसांपासून होत असलेल्या प्रदूषणाचं मूळ 'एबीपी माझा'ने शोधून काढलं आहे. एमआयडीसीतील रासायनिक कंपन्या थेट नाल्यात रासायनिक सांडपाणी सोडत असल्याची बाब 'एबीपी माझा'ने केलेल्या पाहणीत पुराव्यासह समोर आली आहे.


डोंबिवलीच्या खंबाळपाडा परिसरात मोठ्या प्रमाणात रासायनिक कंपन्या आहेत. या कंपन्यांकडून बाहेरुन वाहणाऱ्या नाल्यात छुप्या पद्धतीने पाईप टाकण्यात आले असून त्यातून दररोज हजारो लिटर रासायनिक सांडपाणी थेट नाल्यात सोडलं जातं. यामुळेच काही दिवसांपूर्वी खंबाळपाड्यात केमिकलचा उग्र दर्प पसरला होता. शिवाय दोनच दिवसांपूर्वी संपूर्ण डोंबिवली शहरात उग्र दर्प पसरला होता.


डोंबिवलीतील या प्रदूषणाचं मूळ कारण शोधण्यासाठी 'एबीपी माझा'ने मध्यरात्री एक वाजता एमआयडीसीच्या आत जाऊन नाल्यांची पाहणी केली. यावेळी नाल्यात टाकण्यात आलेल्या छुप्या पाईपमधून हे सांडपाणी नाल्यात आणि काही सांडपाणी हे एमआयडीसीच्या रासायनिक सांडपाण्याच्या चेंबरमध्ये सोडण्यात येत असल्याचं निदर्शनास आलं आहे. मात्र चेंबरमध्ये टाकण्यात आलेले पाईप आता टाकण्यात आले असून त्यामुळे आत्तापर्यंत हे पाणी थेट नाल्यात जात असल्याचं स्पष्ट झालं आहे.


याच मुद्द्यावरून एमपीसीबी अधिकारी आणि कंपन्यांची संघटना असलेल्या कामा संघटनेनं भंगारवाला गोण्या धूत असल्यानं प्रदूषण होत असल्याची आवई उठवली होती. मात्र आता 'एबीपी माझा'ने सत्य समोर आनलं असून आता तरी प्रदूषणकारी कंपन्यांवर कारवाई करण्याची सद्बुद्धी एमपीसीबी अधिकाऱ्यांना होते का? हे पाहावं लागणार आहे.