नागपूर : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आज चहापानाने सुरुवात झाली.  पूर्वसंध्येला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषदा चांगल्याच गाजल्या.  हे अधिवेशन मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासाठी पहिलं अधिवेशन. सोबतच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र विकास आघाडीचं हे तीन चाकांचं सरकार घेऊन त्यांना देवेंद्र फडणवीस आणि भाजपचा सामना करायचा आहे. मात्र या निमित्ताने अनेक मजेशीर किस्से देखील या राजकीय आखाड्यात घडतात. आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला अनेक किस्से, घडामोडी पडद्यामागे रंगल्या.


अजित दादांच्या 'सुटा-बुटा' ची चर्चा

ज्यात सर्वात जास्त चर्चा रंगली ती अजित पवारांच्या डॅशिंग लूकची सायंकाळी चहापानच्या वेळी सर्व नेते मंडळी हळूहळू जमायला लागली. त्यात अजित दादांची एन्ट्री आणि सर्वजण एकमेकांकडे बघायला लागले कारण आज अजित पवार हे नेहमी पेक्षावेगळे दिसत होते डोळ्यावर गाॅगल लावला असता तर बाॅलिवूड, हाॅलिवूड आणि टाॅलिवूडच्या सर्वच हिरोंना दादांनी मागे टाकलं असतं अशी चर्चा रंगली. चहापान संपल्यावर अनेकांनी दादांसोबत फोटो काढण्यासाठी गर्दी केली होती. मी ही मिश्किलपणे विचारलं दादा आज एकदम हिरो दिसतायत तर मला म्हणाले 'थंडीमुळे कोट घातला आहे.

नागपुरात पाय ठेवताच ' ठाकरे' जोशात

आखाड्यात पैलवानाला चितपट केल्यानंतर विजयी पैलवान पुन्हा त्याच्याच घरच्या आखाड्यात खेळायला उतरतो तसंच काही आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं झालं होतं. नागपूरच्या सुपुत्राला चितपट केल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे नागपूरात दाखल झाले होते. त्यामुळे स्वभाविक उद्धव ठाकरेंमध्ये वेगळाच आत्मविश्वास दिसत होता. मंत्री नितीन राऊत आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंचं जल्लोषात स्वागत केलं. नागपूर विमानतळावर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी होती. सोबतीला ढोल ताशे आणि झेंड्यांची जोड होती. देवेंद्र फडणवीसांना मात दिल्यानंतर नागपूरच्या भूमीत पाय ठेवताना उद्धव ठाकरेंचा उत्साह मोठा दिसला पत्रकार परिषदेतही जास्त गोलगोल उत्तरं न देता थेट सरळ आणि स्पष्टपणे उत्तर दिली. कदाचित नागपूरच्या जुन्या मित्रांना हा आत्मविश्वास त्यांना दाखवायचा होता की काय म्हणून आज उद्धव ठाकरे उत्साहात दिसले.

नागपुरात 'नार्वेकरांचा' वेगळाच स्वॅग

उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर याचंही पहिलंच नागपूर अधिवेशन. त्यामुळे नागपूरच्या कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रतिनिधींमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. नागपूर विमानतळापासून ते विधानभवनापर्यंत मिलिंद नार्वेकराचे होर्डिंगवर फोटो होते.  मंत्रिमंडळाचा विस्तार जवळ आलाय. अनेकांनी लाॅबिंग सुरु केलीय त्यात नार्वेकरांची पक्षातली ताकद सर्वच जाणतात.  त्यामुळे नागपूरात नार्वेकरांच्या अवतीभोवती खूप लोकं दिसतायत

फडणवीसांची चर्चा

देवेंद्र भाऊंचा अतिआत्मविश्वास नडला नाहीतर आज ते आमच्या सोबत असते, अशी भावना शिवसेनेच्या काही लोकांमध्ये होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यांवरून शिवसेनेला अडकवण्याचा प्रयत्न देवेंद्र भाऊ करतायत. पण ते शक्य नाही. कारण आता त्याचा काहीही फायदा होणार नसल्याची प्रतिक्रिया शिवसेनेत उमटताना दिसली. शिवाय सत्तेशिवाय फडणवीस एकटे पडल्याची चर्चा शिवसेनेत जास्त होती. अधिवेशनातल्या पुढच्या काही दिवसांत देवेंद्र भाऊ आक्रमक होऊन शिवसेनेला अंगावर घेणार असंच चित्र दिसतंय.