मुंबई : सर्वांसाठी लोकल सुरू करण्याचा विचार आता गांभीर्याने केला जातोय. मात्र गर्दी नियंत्रणात असावी यासाठी कोलकाता येथील मेट्रो प्रमाणे कलर कोड सिस्टीम राबवण्याचा विचार सध्या केला जातोय. गेल्या सात महिन्यांपासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकं कधी आणि कशी सुरू होणार याचा वेगवेगळ्या स्तरात विचार केला जातो आहे. मात्र या संपूर्ण कालावधीत लोकलमध्ये गर्दी होऊ नये यासाठी एकही भक्कम यंत्रणा रेल्वे किंवा राज्य सरकारला उभी करता आली नाही. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी क्यूआर कोड सिस्टीम लागू केली गेली, मात्र नंतर त्यावरचा बंधन देखील बाजूला करून सर्व महिलांना प्रवेश देण्यात आला. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि महिला यानंतर सर्वांनाच लोकलमध्ये प्रवेश देण्यात यावा यासाठी राज्य आणि रेल्वेमध्ये बैठक पार पडली. त्यात रेल्वेकडून कार्यालयीन वेळेत बदल करावा किंवा कोलकाता येथील कलर कोड सिस्टीम प्रमाणे एखादी सिस्टीम लागू करण्यात यावी अशी मागणी केली गेली.


काय आहे कलर कोड ई पास यंत्रणा?


ज्यावेळेस कोलकातामध्ये सहा महिन्यांच्या मेट्रो रेल्वे सुरू करायची होती त्यावेळेस अतिशय हटके सिस्टीम राबवण्याचा विचार केला गेला. मेट्रो मधील गर्दी कमी करण्यासाठी कलर कोड असलेला ई पास देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यासाठी एक नवी यंत्रणा निर्माण केली गेली. कोलकाता मेट्रोमधून जर प्रवास करायचा असेल तर आधी तुम्हाला ईपास घ्यावा लागेल. हा पास मेट्रो रेल्वेचे अॅप, मेट्रो रेल्वेची वेबसाईट यावर उपलब्ध असेल. मात्र त्याला देखील वेळ मर्यादा आहे. तुम्हाला जी ट्रेन पकडायची आहे. त्या ट्रेनच्या वेळेच्या 12 तास आधीपासून हा पास काढता येईल.


"लोकल बंद झाली अन् माझ्या संसाराचा कणाच मोडला; उभ्या आयुष्यात पुन्हा लोकल बंद होऊ नये!"


पास काढण्यासाठी आपल्याला काही माहिती पुरवावी लागेल. आपले नाव, मोबाईल नंबर, ट्रेन पकडण्याचे आणि उतरण्याचे स्टेशन यासोबत कोणत्या वेळेत आपल्याला प्रवास करायचा आहे ती वेळ देखील यात टाकावी लागेल. त्यानंतर ऑनलाईन पैसे भरून आपल्याला मोबाईलवर ई पास उपलब्ध होईल. हा ई पास म्हणजे तिकीट नसून केवळ एक क्यू आर कोड होता. ज्या क्यू आर कोडला प्रत्येक तासाला वेगळा कलर दिला जातो. त्यामुळे ज्याने ज्या वेळेत ट्रेनचा ई पास काढलाय, त्याच वेळेत त्याला प्रवास करता येईल, अन्यथा नाही. स्टेशनवर उभा असलेला अधिकारी प्रवाशाच्या पासचा रंग पाहतो आणि त्याला आत मध्ये प्रवेश देतो.


रेल्वे अधिकारी आणि राज्य सरकारमध्ये झालेल्या बैठकीत याच कलर कोड सिस्टीमचा गांभीर्याने विचार केला जात आहे, असे मंत्री विजय वडट्टीवार यांनी सांगितले. तर या यंत्रणेमुळे रेल्वेने केलेल्या वेगवेगळ्या उपाययोजनांमध्ये मदत होऊन, रेल्वेला देखील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी मदत होईल, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.


सात महिन्यांनी महिलांचा रेल्वे प्रवास, लोकलमधून प्रवासाची परवानगी मिळाल्याचा आनंद


मध्य रेल्वेवर दर दिवशी अंदाजे 45 लाख तर पश्चिम रेल्वेवर दर दिवशी अंदाजे चाळीस लाख प्रवासी हे लॉकडाऊन पूर्वी प्रवास करायचे. तसेच दोन्ही रेल्वे मिळून 3143 लोकल चालवल्या जायच्या आता मात्र केवळ 1410 लोकल धावत आहेत. जर सर्वांना प्रवेश द्यायचा असेल तर या लोकल फेऱ्यांमध्ये आधी वाढ करावी लागेल. सोबत गर्दी नियंत्रण करण्यासाठी कलर कोड सारखी यंत्रणा असेल तरच एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेऊन प्रवास करता येईल. आता राज्य सरकार याबाबत किती गंभीर आहे हे काही दिवसात कळेल.