मुंबई : मुंबईकरांना लोकलने प्रवासाची मुभा नसल्याने त्यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहेत. शारीरिक, मानसिक आणि आर्थिक नुकसान नागरिकांना सहन करावं लागत आहे. सर्वसामन्यांची अडचण ओळखत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. या पत्राची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रवीण दरेकर यांच्या दूरध्वनीवरून चर्चा करुन लोकल सुरू करण्यास मी सकारात्मक असल्याचं सांगितलं आहे. 


सर्वसामान्यासाठी लोकल सुरू करण्याची प्रवीण दरेकर यांनी मागणी केली होती. मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील त्यांनी दिला होता.  लोकल बंद असल्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. अनेकांचे जॉब गेले. लोकांना उध्वस्त करू नका, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं होतं. 


त्यावर  मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, कोरोना लसीचे दोन डोस झालेल्यांचा विचार करता येऊ शकतो. काही अडचणी दूर झाल्यास लोकल सुरू करणे शक्य आहे. आंदोलन करू नका, आपण पर्याय काढू असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रवीण दरेकर यांनी दिलं आहे. 


मुंबईत लोकलचा प्रवास कामावर जाणाऱ्यांसाठी अनिवार्य आहे. लोकलशिवाय अन्य कोणतंही प्रवासाचं साधन आर्थिक तसंच वेळेच्या दृष्टीने परवडणारं नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन्ही डोस घेतलेल्यांना आणि अत्यावश्यक सेवेत नसलेल्यांना लोकल प्रवासाची अनुमती द्यावी अशी मागणी पुढे आलीय.  


सध्या मुंबई महानगर प्रदेशात फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची परवानगी आहे, त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबवण्यात आली आहे. गेल्यावर्षीच्या अनलॉक काळात टप्प्याटप्प्याने मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली होती. यावर्षी अजून त्याबाबत निर्णय झालेला नाही. 


इतर संबंधित बातम्या