कल्याण : लोकलने विनापरवानगी प्रवास करताना पकडलेल्या एका तरुणाचा व्हिडिओ मागील दोन दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. परळ स्थानकावर या तरुणाला पकडण्यात आल्यानंतर त्याने हा व्हिडीओ शूट करून फेसबुकवर टाकला आणि तो चांगलाच व्हायरल झाला. प्रेम सुरोसे असं या तरुणाचं नाव असून बस झालं आता लॉकडाऊन, कोविड कोविड, लोक जगणार तरी कशी, सर्वसामान्य प्रवाशांना रेल्वे प्रवासाची मुभा द्यावी, आम्ही सरकारी कर्मचारी नाहीत, म्हणून आम्ही गुन्हेगार आहोत का?" असा उद्विग्न सवालही या तरुणानं व्हिडीओमधून केला आहे. प्रेमने पोटतिडकीने उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे सर्वांनाच भांडावून सोडलं आहे.
कोरोना प्रादुर्भावामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य प्रवाशांच्या लोकल प्रवासावर बंदी घालण्यात आली. तर केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली. यामुळे खाजगी नोकरदार वर्गाचे मात्र मोठे हाल होत आहेत. कारण तुटपुंजा पगार आणि दररोजचा प्रवासाचा खर्च परवडणारा नसल्याने अनेकांना नोकऱ्यांवरच पाणी सोडावं लागलं. अशावेळी खासगी कंपन्यासुद्धा त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या नाहीत आणि कामावर आला नाहीत, तर नोकरी सोडावी लागेल, असं फर्मान सोडलं. ज्यामुळे हजारो तरुणांच्या नोकऱ्या गेल्या. असाच एक तरूण म्हणजे कल्याण जवळच्या वरप गावात राहणारा प्रेम सुरोसे. मुंबईत नोकरी करणाऱ्या प्रेम यांना लोकल बंद झाल्यामुळे आपल्या नोकरीवर पाणी सोडावं लागलं. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर 23 जून रोजी प्रेम हा पुन्हा एकदा मुंबईतल्या एका खाजगी कंपनीत नोकरीला लागला. मात्र येण्या-जाण्याचा प्रवासाचा खर्च परवडण्याजोगा नसल्यामुळे त्याने मुंबई लोकलने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. मात्र लोकलचं तिकीट फक्त अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांना ओळखपत्र दाखवूनच मिळत असल्यानं त्याने 24 जून रोजी तिकीट न काढता कल्याण ते परळ पर्यंतचा प्रवास केला. मात्र परळ रेल्वे स्थानकात त्याला टिसींनी पकडलं. यावेळी त्याने टिसींसमोर आपली व्यथा मांडली. सोबतच आपल्या खात्यात फक्त 400 रुपये असल्याचंही टिसींना दाखवलं. मात्र नियमानुसार, दंड भरणं भाग असल्यामुळे त्याने एक व्हिडीओ तयार करत आपली व्यथा सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
प्रेम सुरासेचा व्हिडीओ व्हायरस झाल्यानंतर स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्याच्याशी संवाद साधला. प्रेमने कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. मात्र सर्वसामान्यांना जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा सोडून इतरही अनेक गरजा आहेत. सर्वसामान्य नोकरदार वर्गासाठी लाईफलाईन असलेली लोकल बंद आहे. मात्र इतर पर्यायी वाहतूक तरी सुरु करा, अशी अशी मागणी त्यांनं केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :