मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'एकच शरद' या मुलाखतीनंतर आता 'सामना'मध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेण्यात आली आहे. दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा प्रोमो संजय राऊत यांनी आज ट्विटरवर शेअर केला आहे.


"काय म्हणतेय ठाकरे सरकार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दिलखुलास मुलाखत," असं लिहित संजय राऊत यांनी या मुलाखतीचा प्रोमो ट्वीट केला आहे.





या मुलाखतीचं शूटिंग काल म्हणजेच 20 जुलै रोजी पार पडलं. तर येत्या 25 आणि 26 जुलैला ही मुलाखत प्रसारित होणार आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी राज्य ते केंद्र, राम मंदिर निर्माणाचा मुद्दा, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस ते कोरोना प्रादुर्भाव, महाविकास आघाडीचे नेतृत्व ते सरकारचे स्थैर्य अशा विविध विषयांवर भाष्य केलं.


याआधी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतल्याची माहिती संजय राऊत यांनी ट्वीट करत दिली होती. त्यांनी लिहिलं होतं की, "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घणाघाती मुलाखत सामनासाठी घेतली. सर्वच प्रश्नांना दिलखुलास उत्तरे मिळाली. उद्धव ठाकरे यांची दिल की बात राजकारण ढवळून काढेल. कोरोनापासून राम मंदिरापर्यंत मुख्यमंत्री ठाकरे दणक्यात बोलले. मुलाखत 25, 26 जुलै रोजी वाचता पाहता येईल."





संजय राऊत यांनी याआधी महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकार शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. यात त्यांनी शरद पवार यांना कोरोनापासून महाविकास आघाडी सरकारमधील कुरबुरी तसंच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गौप्यस्फोटासह अनेक प्रश्न विचारले होते. यावर शरद पवार यांनी रोखठोक उत्तरं देत फडणवीसांचे दावे फेटाळले होते. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या मुलाखतीत कुठले गौप्यस्फोट केले असतील, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.


संबंधित बातम्या


भाजपनेच राष्ट्रवादीला सत्तेसाठी विचारणा केली होती, फडणवीसांच्या गौप्यस्फोटांमध्ये तथ्य नाही : शरद पवार


'एक शरद बाकी गारद' हे बाळासाहेबांनीच म्हटलं होतं, फडणवीसांना बेस पक्का करावा लागेल : संजय राऊत