मुंबई : "देवेंद्र फडणवीस राजकारणात नव्हते, त्याआधी बाळासाहेब ठाकरे यांनी 'एक शरद बाकी गारद' हे म्हटलं होतं. त्यामुळे फडणवीस यांना अभ्यासात थोडा बेस पक्का करावा लागेल," असा प्रतिटोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील राजकारणासह कुख्यात गुंड विकास दुबेचा एन्काऊंटरवर भाष्य केलं. विकास दुबेच्या एन्काऊंटरवरुन राजकारण करु नये असा सल्लाही त्यांनी दिला.


शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली. 'एक शरद बाकी गारद' असं शीर्षक असलेल्या मुलाखतीचा प्रोमो दोन दिवसांपूर्वीच शेअर केला होता. यावरुन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या मुलाखतीला 'एक शरद बाकी गारद' ऐवजी, 'एक नारद बाकी गारद' असं शीर्षक द्यायला हवं होतं, असा टोला लगावला. त्याचबरोबर बाकी सर्व गारद असतील, तर उद्धव ठाकरेही गारद आहेत का?' असा प्रश्नही त्यांनी विचारला होता.


शरद पवारांचे नेमके गौप्यस्फोट कोणते? संजय राऊतांनी घेतलेल्या मुलाखतीची उत्सुकता!


'देवेंद्र फडणवीसांना बेस पक्का करावा लागेल'
याबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले की,"देवेंद्र फडणवीस राजकारणात नव्हते, त्याआधी शरद पवार यांच्या राजकीय झंझावातावर बाळासाहेब ठाकरे यांनी मार्मिकमध्ये अग्रलेख लिहिला होता, त्याचं हे टायटल आहे. एक शरद बाकी गारद, हे बाळासाहेबांनी म्हटलं होतं त्या काळात. खरंतर बाळासाहेबांनी त्यावेळी दोन शरदांविषयी लिहिलं होतं, दुसरे शरद म्हणजे शरद जोशी. त्यामुळे त्यांनी 'दोन शरद सगळे गारद' असं म्हटलं होतं. आता एक शरद नाहीत, त्यामुळे राहिले एकच शरद. त्यामुळे त्यांना अभ्यासात थोडा बेस पक्का करावा लागेल. हे बाळासाहेबांचं वाक्य आहे, पवारांविषयी म्हटलेलं. तेव्हा ते राजकारणात नव्हते. आम्ही बाळासाहेबांसोबत काम करत होतो."


विकास दुबे एन्काऊंटरचं राजकारण करु नये
उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये आठ पोलिसांचं हत्याकांड घडवून आणणारा कुख्यात गुंड विकास दुबे आज पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार झाला. विकास दुबेच्या या एन्काऊंटरवर विरोधक प्रश्नही उपस्थित करत आहेत. त्यावर संजय राऊत म्हणाले की, "विकास दुबेच्या एन्काऊंटरचं कोणीही राजकारण करु नये. एन्काऊंटरवर शंका उपस्थित करणं म्हणजे पोलिसांचं खच्चीकरण करण्यासारखं आहे. खाकी वर्दीची भीती राहिली पाहिले. पोलिसांची भीती राहिली नाही तर गुंडाराज येईल."