मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेसाठी भाजपसोबत कधीच चर्चा केली नाही. उलट भाजपनेच राष्ट्रवादीला सत्तेसाठी विचारणा केली होती. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत केलेल्या गौप्यस्फोटांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. दैनिक 'सामना'चे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार यांनी घेतलेल्या मुलाखत शरद पवार बोलत होते. 'एकच शरद' या मुलाखतीचा आज तिसरा आणि अखेरचा भाग प्रसारित झाला.
"राष्ट्रवादीने सत्तेसाठी भाजपसोबत कधीच चर्चा केली नाही. शिवसेनेला दूर ठेवून सरकार बनवू असं प्रस्ताव भाजपनेच दिला होता," असं शरद पवार म्हणाले. त्यांनी सांगितलं की, "शिवसेनेला आम्हाला बरोबर घ्यायचं नाही. तुम्ही आम्हाला स्थिर सरकार बनवायला साथ द्या, असं काही भाजप नेते आमच्याशी दोन ते तीन वेळा बोलले होते. पंतप्रधानांनी माझे संबंध चांगले आहेत, त्यामुळे पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावा आणि मी संमती देईन, अशी अपेक्षा होती. ही बाब माझ्या कानावर आली. परंतु पंतप्रधानांकडे माझ्याबद्दल किंवा पक्षाबद्दल चुकीची माहिती जाऊ नये, यासाठी मी दिल्लीत जाऊन पतंप्रधानांची भेट घेतील. त्यांना स्पष्ट सांगितलं की आम्ही तुमच्यासोबत येणार नाही, जमलं तर शिवसेनेसोबत जाऊ किंवा विरोधी पक्षात बसू. हे सांगायला जाताना एक गृहस्थ माझ्याशेजारी होते त्यांचं नाव संजय राऊत."
भाजपचं 'ऑपरेशन कमळ' म्हणजे सत्तेचा दुरुपयोग
याशिवाय महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी केंद्र सरकारने सत्तेचा गैरवापर केल्याचा गंभीर आरोप शरद पवार यांनी केला आहे. "भाजपचे लोक महाराष्ट्रातील आघाडी सरकार पाडायचे म्हणतात. सरकार पाडायचे म्हणणाऱ्यांना जनमानसात किती स्थान? आधी म्हणायचे 3 महिन्यांत पाडू, आता म्हणतायत 6 महिन्यात पाडू. भाजपचं 'ऑपरेशन कमळ' म्हणजे सत्तेचा दुरुपयोग आहे. 'ऑपरेशन कमळ'चा महाराष्ट्रात काहीच फरक पडणार नाही," असंही शरद पवार म्हणाले.
उद्धव ठाकरेंच्या कामाची पद्धत आमच्यापेक्षा वेगळी
उद्धव ठाकरे यांच्या कामाची पद्धत आमच्यापेक्षा वेगळी आहे. त्यांच्या कामाची पद्धत ही शिवसेनेच्या आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून बघतोय, की आदेश येतो, त्या आदेशाची अंमलबजावणी होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी ज्या विचारांनी वाढलोय, आम्ही वरिष्ठांच्या मताचा आदर करतो, पण वरिष्ठांकडून आदेशच येतो असं नाही. समजा एखाद्याने मत मांडलं तर आम्ही त्यावर चर्चा किंवा विचार करु शकतो. ही आमच्या कामकाजाची पद्धत आहे. शिवसेनेमध्ये नेतृत्त्वाने भूमिका घेतल्यानंतर की त्याच रस्त्याने जायचं आणि अंमलबजावणी करायची, ही पद्धत अगदी लहान-थोरांपासून चालली आहे. याच्याबद्दल माझी तक्रार नाही. आताचं सरकार एकट्याचं नाही तर तिघांचं आहे. या तिघांमध्ये जर दोघांची काही मतं असतील तर ती जाणून घेण्याची आवश्यकता आहे. आपण डायलॉग ठेवू अशी आमची सूचना असते. लोकशाही डायलॉग कायम ठेवला तर बिघाडीची चर्चा रंगणार नाही.
प्रियांका गांधीचं घर काढून घेणं क्षुद्रपणाचं राजकारण
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना दिल्लीचं राहतं निवासस्थान रिकामं करण्यास सांगण्यात आलं आहे. एसपीजी सुरक्षा कमी केल्याने प्रियांका गांधी या घरात राहू शकत नाही, असं कारण देण्यात आलं. याविषयी संजय राऊत यांनी शरद पवारांना विचारलं असता ते म्हणाले की, "हातातील सत्ता विनयाने वापरायची असती. प्रियांका गांधींना घराबाहेर काढण्यामागे सत्तेचा दर्प आहे. त्याचं घर काढून घेणे हा राजकीय क्षुद्रपणा आहे.