मुंबई : स्वतंत्र विदर्भासाठी मतदान करणारा व्यक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी का? असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्यांची मागणी केली आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.


 

“संयुक्त महाराष्ट्राबाबत मुख्यमंत्री मौन बाळगतात. शिवाय, फडणवीसांना स्वतंत्र विदर्भासाठी मतदानही केलं होतं. त्यामुळे, देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी राहण्याची अधिकार नाही, त्यांनी राजीनामा द्यावा.” असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. शिवाय, श्रीहरी अणेंना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपनेच पुढे केल्याचा आरोप राज यांनी केला आहे.

 

फडणवीस यांनी 2013 साली वेगळ्या विदर्भाच्या बाजूने मतदान केले होते. त्याबाबत त्यांनी फेसबुकवर पोस्टही अपलोड केली होती. या फेसबुक पोस्टचा दाखल देत राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

 

“मुंबई वेगळी करण्याची चाल”

 

कोणत्याही राष्ट्रीय पक्षाला राज्यांबद्दल काहीही कळवळा नसतो, ते राज्य तोडायलाच बसले आहेत. शिवाय, वेगळ्या विदर्भाची मागणी म्हणजे महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्याची चाल असल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी यावेळी केला. संघ आणि भाजपची ही चाल असून, अणेंसारख्यांना पुढे करुन ते आपली भूमिका रेटत असतात, असाही आरोप राज यांनी केला.

 

शिवसेनेचं सत्तेत राहून विरोधाचं ढोंग   

 

“शिवसेना सत्तेत पण राहते आणि आंदोलनं पण करतेय, याचा अर्थ काय? शिवसेना सत्तेत राहून विरोध करण्याचं ढोंग करते, सत्तेतून बाहेर का पडत नाहीत?” असा सवाल उपस्थित करत राज यांनी शिवसेनेवरही तोफ डागली.

 

यावेळी राज ठाकरे यांनी 1 मे रोजी मुंबईतील हुतात्मा चौकात सजावट केली जाते, याचे पुरावेही सादर केले आणि राज्यातील सत्ताधीर शिवसेना-भाजपवर सडकून टीका केली.

 

राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे:

 

  • शिवसेना सत्तेत राहून विरोध करण्याचं ढोंग करते, सत्तेतून बाहेर का पडत नाहीत?- राज ठाकरे

  • वेगळा विदर्भ म्हणजे महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्याची चाल - राज ठाकरे

  • शिवसेना सत्तेत पण राहते आणि आंदोलनं पण करतेय, याचा अर्थ काय? - राज ठाकरे

  • कोणत्याही राष्ट्रीय पक्षाला राज्यांबद्दल काहीही कळवळा नसतो,ते राज्य तोडायलाच बसलेत-राज ठाकरे

  • शेतकऱ्यांना विहिरी दिल्याचं सांगतात, पण ते केवळ पेपरवर आहे, प्रत्यक्षात नाही - राज ठाकरे

  • फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी राहण्याचा अधिकार नाही, त्यांनी राजीनामा द्यावा - राज ठाकरे

  • स्वतंत्र विदर्भासाठी मतदान करणारा व्यक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी का?- राज ठाकरे

  • संयुक्त महाराष्ट्राबाबत मुख्यमंत्र्यांचं मौन,फडणवीस यांनी स्वतंत्र विदर्भासाठी मतदान केलं होतं - राज ठाकरे

  • 1 मे रोजी हुतात्मा चौकात सजावट केली जाते, राज ठाकरेंकडून पुरावे सादर

  • वेगळ्या विदर्भासाठी श्रीहरी अणेंना संघ-भाजपनेच पुढे केलंय- राज ठाकरे