कल्याण :  ट्रेनमध्ये प्रवासी बेसावध असल्याचं पाहून तसंच गर्दीची संधी साधून त्यांचे मोबाईल फोन चोरणाऱ्या त्रिकुटाचा पर्दाफाश करण्यात आला आहे. कल्याण रेल्वे  क्राईम ब्रान्चच्या पथकाने ही कारवाई केली आहे.


 

राजू रामैया,सॅम्युअल रामैया, रमेश शुब्बू अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावं आहे. विशेष म्हणजे हे तिघे उच्चशिक्षित आहेत. इंग्लिशमध्येच बोलत असल्याने हे चोर असल्याचा संशय कोणालाही येत नव्हता.

 

राजू रामैया, सॅम्युअल रामैया हे मूळचे आंध्रप्रदेशातील असून रमेश शुब्बू हा कर्नाटकचा रहिवासी आहे.
महिनाभरापासून ट्रेनमधून मोबाईल चोरी होण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याने पोलिस यंत्रणासमोर आव्हान उभं राहिलं होतं. या गुन्ह्यांचा वाढता आलेख पोलिसांची डोकेदुखी ठरु लागला होता. या चोऱ्या फक्त एसी आणि स्लीपर कोचमध्ये होत होत्या. या तक्रारींची दखल घेत कल्याण रेल्वे क्राईम ब्रान्चने या चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली.

 

यादरम्यान कल्याण रेल्वे क्राईम ब्रान्चच्या पोलिसांना या टोळीची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानकावर सापळा रचला आणि तिघेही पोलिसांच्या जाळ्यात अडकले. या त्रिकुटाकडून 70,000 हजार रुपयांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

 

हे तिघे बाहेर गावी जाणाऱ्या गाड्यांमधील वातानुकुलित डब्यामधील प्रवाशांवर लक्ष ठेवून असायचे. संधी मिळाल्यावर त्यांचे मोबाईल फोन लंपास करत आणि कल्याण ते कर्जत दरम्यान ते पसार व्हायचे.

 

हे त्रिकुट दिवसभरात 30 ते 40 मोबाईल फोन लंपास करायचे. हे तिघेही उच्चशिक्षित असून फक्त इंग्लिश भाषा बोलायचे. त्यामुळे कोणालाही त्यांचा संशय येत नसे, अशी माहिती पोलिसांनी दिली.