पालघर : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान माध्यमांशी संवाद साधला. या दौऱ्यात त्यांनी पालघर जिल्ह्यातील आदिवासी बहुल असलेल्या जव्हार भागातील रुग्णालयाची पाहणी केली. जामसर येथील बाल उपचार केंद्र, कॉटेज हॉस्पिटल, खरवंद अंगणवाडी तसेच प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांची देखील पाहणी केली.


जव्हार सारख्या ग्रामीण भागात असलेली आरोग्यव्यवस्था सुधारण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. तसंच जिल्ह्यातील कुपोषण आणि बालमृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी काय उपाययोजना करायला हव्या याचा आढावाही घेतला. पालघर हा नव्याने तयार झालेला जिल्हा असल्यामुळं तेथील परिस्थितीची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. आज जव्हारला भेट दिली असली तरीही आपल्याला संपूर्ण पालघरचा विकास करायचा आहे, असं आश्वासक वक्तव्य त्यांनी केलं.


नाशिककरांसाठी मोठी बातमी! या वर्षीपासून नाशिकला वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार, मंत्री छगन भुजबळांची माहिती


जव्हारचा पर्यटन विकास...


जव्हार हे एक गिरीस्थान आहे. या भागात करण्याजोग्या अनेक गोष्टी आहेत. मुळात या भागातील आदिवासींचा विकास करायचा असेल तर इथं रोजगाराच्या संधी उपलब्ध करून आणि शिक्षणावर भर देऊनच हे साध्य करता येईल ही बाब त्यांनी अधोरेखित केली.


जव्हार हे एक चांगले निसर्गरम्य ठिकाण असून येथील राजे मुकणे यांच्याशी आपली आज भेट झाली त्यांनी त्यांच्या संस्थानाची जागा वैद्यकिय महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी देण्याचं सांगितलं असल्यामुळे या भागात शिक्षण आणि आरोग्याची चांगली व्यवस्था करता येईल, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. फक्त आरोग्य व्यवस्थाच नव्हे, तर रोजगार आणि दळणवळणावरही लक्ष देण्याचा विषय त्यांनी मांडला.


बंद दाराआडची चर्चा


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काही दिवासंपूर्वीच सिंधुदुर्ग येथे, उद्धव ठाकरे यांच्याशी बंद दाराआड झालेल्या चर्चेचा वादाला पुन्हा वाचा फोडली होती. ज्यावर उपरोधिक वक्तव्य करत माध्यांमशी संवाद साधतेवेळी आम्ही बंद दारा आड चर्चा केली, त्यामध्ये सर्व मुद्दे माझ्या विचाराधीन आहेत असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेकडे सर्वांचं लक्ष वेधलं. यावेळी त्यांनी शाह यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यास बगल दिली.


मी घोषणा करत नाही...


मी घोषणा करत नाही, पण सर्व विकासकामं मात्र करेन असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी घोषणाबाजीच्या राजकारणावरही वक्तव्य केल्याचं पाहायला मिळालं. पालघर आणि परिसरामध्ये आपल्याला जलद गतीने विकासाची गाडी रुळावर आणायची आहे असं म्हणत इथं एक ठिकाणी छोटी धावपट्टी पण उभारू म्हणजे सर्वांची विमान उतरतील, असं खोचक उत्तरही त्यांनी दिलं. त्यांच्या या वक्तव्याचा रोख राज्यपाल विमान उड्डाणास नाकारलेल्या परवानगी प्रकरणाकडे असल्याचं यावेळी स्पष्ट झालं.