मुंबई : मुंबई विद्यापीठाने निकालाच्या बाबतीत यंदा कोर्टालाच तारीख पे तारीख दिल्यानंतरही विद्यापीठाच्या निकालाचा घोळ संपलेला नाही. मुंबई विद्यापीठाच्या या ऐतिहासिक दिरंगाईनंतरही अजून सुमारे 11 हजार 981 विद्यार्थ्यांचे निकाल लावण्यात आलेले नाहीत.


विद्यापीठाच्या या अक्षम्य चुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईचे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची बैठक पार पडली. राजभवनावर झालेल्या बैठकीत राज्यपालांनी विद्यापीठाच्या एकूण परिस्थितीचा आढावा घेतला. सोबतच उरलेल्या 11 हजार 981 विद्यार्थ्यांचे निकाल तातडीने लावण्याचे आदेशही राज्यपालांनी दिले.

निकालाला लावलेला उशीर आणि गोंधळ यामुळे अनेकांचे निकाल चुकीच्या पद्धतीने लावल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी केला. त्यामुळे तब्बल 48 हजार 806 विद्यार्थ्यांनी आपल्या उत्तर पत्रिका पुनर्मूल्यांकनासाठी पाठवल्या आहेत.

या संबंधीची प्रक्रियाही लवकरात लवकर पूर्ण करावी, असे आदेश राज्यपालांनी दिले. सोबतच येत्या हिवाळी परीक्षांच्या सत्राचे निकाल 30 दिवसांच्या आत लावण्याती सक्त ताकीदही दिली.

विद्यापीठाचं शैक्षणिक ऑडिट आणि विद्यापीठावरच्या आर्थिक भाराबद्दलही या बैठकीत चर्चा करण्यात आली. उन्हाळी परीक्षांच्या वेळी निकालाच्या बाबतीत विद्यापीठाने जो गोंधळ घातला तो पुन्हा कधीही होता कामा नये, अशी सक्त ताकीदही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

पेपर तपासणीची प्रक्रिया अधिक सुसज्ज करण्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी विद्यापीठाला सुनावलं. मुंबई विद्यापीठ हे जगभरात ख्याती असणारं महत्वाचं विद्यापीठ आहे आणि त्याचा दर्जा आपण टिकवायला हवा, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

यावर्षी मुंबई विद्यापीठाने निकालांच्या बाबतीत घातलेला गोंधळ, विद्यार्थ्यांची झालेली दैना आणि एकूणच मुंबई विद्यापीठाच्या नावाने झालेला शिमगा, या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून इथून पुढचे निकाल लावण्यासाठी तरी विद्यापीठ घोळ घालणार नाही अशी आशा आहे.