Eknath Shinde Meets Senior Shiv Sena Leader : आधी आमदार, मग खासदार त्यानंतर नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा मोर्चा आता शिवसेनेच्या नेत्यांकडे वळला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या जुना जाणत्या बाळासाहेबांसोबत शिवसेनेची (Shiv Sena) मुहूर्तमेढ रोवलेल्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. जुन्या शिवसैनिकांची विचारपूस करत या नेत्यांची काळजी घेण्याचं काम सध्या शिंदे करत आहेत. त्यामुळे आता नेत्यांनाही आपल्या गटात सामील करुन घेण्याची ही रणनीती आहे का असा सवाल उपस्थित झाला आहे. 


एक नजर टाकूया शिवसेनेच्या मूळ नेत्यांच्या यादीवर  


सुभाष देसाई 
दिवाकर रावते 
संजय राऊत 
चंद्रकांत खैरे 
अनंत गिते 
सुधीर जोशी (निधन)
रामदास कदम (शिंदे गटात)
आनंदराव अडसूळ (शिंदे गटात)
गजानन कीर्तिकर  (शिंदेंनी भेट घेतली)
मनोहर जोशी (शिंदेंनी भेट घेतली)
लीलाधर डाके (शिंदेंनी भेट घेतली)
एकनाथ शिंदे (सध्या मुख्यमंत्री आहेत)


शिवसेनेच्या कार्यकारणीत पक्षप्रमुखांनंतर नेतेपदाला मोठं महत्त्व आहे. नेत्यांच्या उपस्थित महत्त्वाचे निर्णय, महत्त्वाच्या बैठका घेतल्या जातात. शिवसेनेत एकूण 12 नेते आहेत त्यापैकी 1 नेत्याचं निधन झालं आहे तर तीन नेत्यांनी मूळ शिवसेना सोडली. तीन नेत्यांच्या गाठीभेटी एकनाथ शिदेंनी घेतल्या आहेत. त्यामुळे 12 पैकी 6 नेते शिंदे गटात सामील झाले तरी आगामी काळातली समीकरण बदलू शकतात.


आमदार खासदारांपाठोपाठ जर नेतेही शिंदे गटात सहभागी झाले तर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसू शकतो, कारण हे फक्त नेते नाहीय तर बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावत काम करत आलेले शिवसैनिक आहेत. 


शिवसेनेच्या 55 आमदारांपैकी 39 आमदार आणि 11 अपक्षांनी शिंदे साथ दिली आहे तर 18 खासदारांपैकी 12 खासदार शिंदे गटात सहभागी झाले आहेत. आता हळूहळू विभागप्रमुख, शाखाप्रमुख, जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख, युवा सेना सचिव आणि विस्तारकही शिंदे गटात सहभागी झाले आहेत. सहानुभूतीपर भेटीनंतर शिवसेनेचे नेते शिंदे गटात सहभागी झाले तर नवल वाटायला नको. उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांकडून कायदेशीररित्या करारनामे करुन घेतले आहेत. दुसरीकडे शिंदे डायरेक्ट सगळ्यांनाच आपल्याकडे घेत शिवसेनेवर दावा करण्याच्या तयारीतच दिसत आहेत. तेव्हा अजून कोणाकोणाच्या गाठीभेटीत काय काय दिलंय हे लवकरच स्पष्ट होईल.


संबंधित बातम्या



Shinde-Kirtikar Meet : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार गजानन कीर्तिकर यांची भेट, कीर्तिकर शिंदे गटात सामील होणार?


Eknath Shinde Meets Liladhar Dake : लीलाधर डाके यांनी जे काही केलं ते 'शिवसेना' या चार अक्षरांसाठी : एकनाथ शिंदे