Eknath Shinde Meets Liladhar Dake : "प्रतिकूल परिस्थितीत शिवसेना वाढवण्याचं काम लीलाधर डाके यांनी केलं. आताची जी शिवसेना पाहतो त्यात डाके साहेबांचं योगदान मोठं आहे. स्वत:साठी काही निर्माण केलं नाही, जे केलं ते शिवसेना या चार अक्षरांसाठी आणि बाळासाहेबांच्या विचारांसाठी," अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली. एकनाथ शिंदे यांनी आज शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डाके (Liladhar Dake) यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी भेटीबाबत सविस्तर प्रतिक्रिया दिली.


प्रतिकूल परिस्थितीत शिवसेना वाढवण्याचं काम डाके साहेबांनी केलं : एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे म्हणाले की, "शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आदरणीय लीलाधर डाके यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मी आज आलो होतो. ही सदिच्छा भेट होती. शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी त्यांचं योगदान मी खूप जवळून पाहिलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचे सुरुवातीचे नेते होते त्यामध्ये डाके साहेबांचा समावेश होता. आनंद दिघे साहेब आणि डाके साहेब यांचे स्नेहाचे संबंध होते. प्रतिकूल परिस्थितीत शिवसेना वाढवण्याचं काम त्यांनी केलं. आताची जी शिवसेना पाहतो त्यात डाके साहेबांचं योगदान मोठं आहे. मंत्रिपद मिळून सुद्धा त्यांची राहणी अत्यंत साधी आहे. स्वत:साठी काही निर्माण केलं नाही, जे केलं ते 'शिवसेना' या चार अक्षरांसाठी आणि बाळासाहेबांच्या विचारांसाठी. अशा नेत्यांमुळे, कार्यकर्त्यांमुळे बाळासाहेबांची शिवसेना पुढे गेलेली आहे. म्हणून ज्येष्ठ नेते डाके साहेबांना एक शिवसैनिक म्हणून भेटायला आलो."


मनोहर जोशी यांच्या भेटीबाबत म्हणाले, 'प्रत्येक ज्येष्ठ नेत्याचे आशीर्वाद घेणार'
संध्याकाळी मनोहर जोशी (Manohar Joshi) यांची भेट घेण्याबाबत एकनाथ शिंदे म्हणाले की, "शिवसेनेत योगदान दिलेल्या प्रत्येक ज्येष्ठ नेत्याची भेट घेणार आहे. राज्याचा मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रत्येकाचा आशीर्वाद घेणार आहे. कारण त्यांच्या गेल्या अनेक वर्षांच्या अनुभव उपयोग राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी, सर्वसामान्यांच्या हितासाठी करण्याचा प्रयत्न करणार आहे.


एकनाथ शिंदे यांचा मोर्चा ज्येष्ठ नेत्यांकडे
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली 40 आमदारांनी बंडखोरी केली आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडावी लागली. त्यानंतर 12 खासदारांनीही एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत गटात सामील झाले. आता एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांकडे मोर्चा वळवलेला दिसत आहे. शिवसेनेत नेतेपद भूषवणारे लीलाधर डाके यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संध्याकाळी ते माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते  यांची भेट घेणार आहेत. यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे नेते आणि खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांची भेट घेतली होती. तर नेत्यांच्या यादीपैकी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ हे आधीच शिंदे गटात सहभागी झाले आहेत.


संबंधित बातम्या



Shinde-Kirtikar Meet : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार गजानन कीर्तिकर यांची भेट, कीर्तिकर शिंदे गटात सामील होणार?