Patra Chawl Land scam Swapna Patkar: पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडीकडून चौकशी सुरू असलेल्या स्वप्ना पाटकर (Swapna Patkar) यांना जीवे मारण्याची धमकी मिळत आहे. पाटकर यांनी याबाबत वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत  (Sanjay Raut) यांच्या विरोधात दिलेला जबाब बदलावा यासाठी जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याची तक्रार स्वप्ना पाटकर यांनी केली आहे. 


मुंबईतील पत्राचाळ पुनर्विकास  प्रकल्पात झालेल्या घोटाळा प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात स्वप्ना पाटकर या साक्षीदार आहेत. ईडीने स्वप्ना पाटकर यांचा जबाब नोंदवला आहे. त्यांची चौकशी देखील झाली आहे. संजय राऊत यांच्याविरोधात दिलेला जबाब मागे घ्यावा यासाठी बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याचे स्वप्ना पाटकर यांनी तक्रारीत म्हटले आहे. स्वप्ना पाटकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सोमय्या यांच्या सांगण्यावरून संजय राऊत यांचे नाव घेतले असल्याचे सांगण्यात यावे. ही धमकी ईडीकडून संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी सुरू असलेल्या कारवाईच्या अनुषंगाने असावेत असे पाटकर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. 


धमकी देणाऱ्यांकडून माझ्यावर पाळत ठेवली जात असून मोबाइलही हिसकावण्याचा प्रयत्न केला असल्याचे स्वप्ना पाटकर यांनी म्हटले. मागील अनेक दिवसांपासून धमकी मिळत असून मानसिक त्रासही दिला जात असल्याचे स्वप्ना पाटकर यांनी तक्रारीत नमूद केले आहे. माझा मोबाइल क्रमांक परिसरातील सार्वजनिक ठिकाणी लिहिला आहे. घरी येणाऱ्या वृत्तपत्रातून जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याचे पाटकर यांनी सांगितले. या प्रकरणी एफआयआर नोंदवून तपास करण्याची मागणी त्यांनी केली आहे. 


पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांचे निकटवर्तीय समजले जाणारे सुजीत पाटकर यांची ईडीने चौकशी केली आहे. स्वप्ना पाटकर ह्या सुजीत पाटकर यांच्या पत्नी होत्या. त्यांनी घटस्फोट घेतला आहे. काही दिवसांपूर्वी स्वप्ना पाटकर यांनी ईडी कार्यालयात कागदपत्रांसह चौकशीसाठी हजेरी लावली. 


पत्रचाळ प्रकरण काय?


मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा आरोप आहे. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळचे 3 हजार फ्लॅट बांधकाम करायचे होते, त्यापैकी 672 फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती. परंतु 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 25 टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर 2011, 2012 आणि 2013 मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले.