Mumbai News:  मानखुर्दहून ठाण्याला जाणाऱ्या मुंबईकरांची आता वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. घाटकोपर छेडानगर चौकातील मानखुर्द-ठाणेच्या दिशेने जाणाऱ्या उड्डाणपूलाचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या उड्डाणपूलामुळे घाटकोपरमधील छेडानगर परिसरातील वाहतूक कोंडीच्या समस्येतून वाहनचालक-प्रवाशांची सुटका होणार आहे. हा उड्डाणपूल 1235 मीटर लांबीचा आहे.


उड्डाणपुलाचा फायदा काय?


छेडानगर जंक्शन परिसरातील मानखुर्द आणि ठाण्याला जोडणाऱ्या रस्त्यावरील पुलाचे उद्घाटन झाल्याने त्याचा फायदा प्रवास करणाऱ्या सर्वांना होणार आहे. छेडानगर चौकामध्ये होणाऱ्या वाहतुकीमध्ये सर्वात जास्त प्रमाण मानखुर्द- ठाणे दिशेकडील वाहतुकीचे आहे. सदर उड्डाणपुलामुळे मानखुर्द-ठाणे दिशेकडील वाहतूक सिग्नल मुक्त होणार आहे. मानखुर्द-ठाणे दिशेकडील वाहतूक सिग्नल मुक्त झाल्याने इतर दिशेकडील वाहतुकीस अतिरिक्त कालावधी उपलब्ध होणार असून त्या दिशेकडील वाहतुक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.  छेडानगर चौकात होणारी वाहतूक कोंडी कमी झाल्याने वाहतूक वेळेत सुमारे 20 ते 25 मिनिटांची बचत होणार आहे. वाहतुक कोंडी कमी झाल्यामुळे इंधनाचा होणारा अपव्यय टळणार आहे. 






उड्डाणपुलाचे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, या उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे. रस्ते, मेट्रो असे अनेक प्रकल्प सध्या सुरू आहेत. मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त करणार आहोत, असेही त्यांनी म्हटले. 


सांताक्रूझ कुर्ला लिंक रोड उड्डाणपुलाचे उद्घाटन 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सांताक्रूझ कुर्ला लिंक रोडवरून सांताक्रूझ येथे पश्चिम द्रुतगती महामार्गाला जोडणाऱ्या मार्गिकेचे देखील लोकार्पण करण्यात आले. या उड्डाणपूलामुळे पूर्व उपनगरातून पश्चिम उपनगरांमध्ये जाणे अधिक सोपे होणार आहे. त्याशिवाय वाहन चालकांचा वेळ वाचणार आहे.