Mumbai Coronavirus Update : एकीकडे देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असताना मुंबईतील रुग्णसंख्याही वाढताना दिसत आहे. आज मुंबईत नवीन 274 कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर 216 रुग्ण बरे झाले आहेत. यापैकी आज 13 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईत आज कोरोनामुळे कुणाचाही मृत्यू झालेला नाही. 


मुंबईत एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 1635 वर पोहोचली आहे. आतापर्यंत रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 13 ने वाढून ती 121 वर पोहोचली आहे. तर ऑक्सिजन बेडवर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 34 इतकी झाली आहे. मुंबईत आतापर्यंत 11,59,819 रुग्णांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत 11.38,432 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.  


मुंबईत आज कोरोनाच्या एकून 2,026 चाचण्या घेण्यात आल्या असून आतापर्यंत 1,88,17,140 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. 


मुंबईत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा दर 98.2 टक्के इतका आहे. 


महापालिकेचे आवाहन


मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन महापालिकेने केले आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क घालणे, शिंकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड झाकण्यासाठी रुमाल किंवा टिश्यू पेपर वापरणे, हाताची स्वच्छता राखणे, वारंवार हात धुणे, आजारी असल्यास घरात विलगीकरणात राहणे तसेच श्वसनाचे आजार असल्यास वैयक्तिक संपर्क मर्यादित करणे या गोष्टींचे पालन करण्याचं आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आलं आहे. 


वाढत्या कोरोनाच्या उद्रेकाने पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढत असताना लॉकडाऊन लागेल का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय. कोरोना एन्डॅमिक झाल्यानंतर कोरोनाचे अनेक व्हेरियंट बघायला मिळत आहेत. अशात ओमायक्रॉनच्या एक्सबीबी 1.16 या सब-व्हेरीयंटमुळे रुग्णसंख्या वाढत आहे. अशात सरकारी रुग्णालयात मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलंय. त्यामुळे वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा मास्क घालावा का? असा प्रश्न निर्माण झालाय. 


कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. गौतम भन्साळी यांनी केलेलं आवाहन


कोव्हिड रुग्णांची संख्या वाढत आहे, अशात बूस्टर डोस ज्यांनी घेतले नसतील अशांनी बूस्टर डोज घेतले पाहिजे.


लस घेतली असेल तरीही तुम्हाला कोव्हिड होऊ शकतो. मात्र आजाराची तीव्रता कमी होताना बघायला मिळते. सहव्याधी असलेल्या रुग्णांना अधिक धोका असतो. अशात त्यांनी बूस्टर डोस घेतला पाहिजे. 


रुग्णालयात जात असाल तर मास्क घालावा. ज्या लोकांना सर्दी, खोकला, ताप आहे अशांनी मास्क घातला पाहिजे.


बंदिस्त ठिकाणी जात असाल तर मास्क घालावा.


देशात सर्वत्र कोरोनाच्या लढाईसाठी सज्ज राहण्यासाठी मॉकड्रिल पार पडताना बघायला मिळाले. मात्र, अद्यापही रुग्णालयात भर्ती होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे आणि ती कमीच राहणार असल्याचा अंदाज तज्ज्ञ डॉक्टरांकडून व्यक्त केला जात आहे. 


सुरुवातीला साथीच्या महामारीत मास्क सर्वत्र बंधनकारक करण्यात आलं होतं. त्यानंतर जशी जशी रुग्णसंख्या कमी झाली तसे नियमात बदल होत गेले. त्यानंतर चेहऱ्यावरील मास्क देखील निघालेत. मात्र कोरोनावरील औषध अद्यापही बाजारात आलेलं नाही. त्यामुळे कोव्हिडच्या लढाईत मास्क हे देखील एक व्हॅक्सिन आहे. अशात रुग्णसंख्या आटोक्यात ठेवायची असेल तर मास्कदेखील लावला पाहिजे.