नवी मुंबई : येत्या ऑक्टोबर महिन्यात 17 वर्षाखालील होणाऱ्या फिफा वर्ल्डकपचे 5 सामने नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणार आहेत. पण वर्ल्डकपचे सामने संपल्यानंतर मैदान तोडण्यात यावं असा अजब फतवा सिडकोने काढला आहे.
फुटबॉल सामन्यांच्या सरावासाठी नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशननं 4 कोटी रुपये खर्च करून मैदान तयार केलं आहे. यासाठी स्पोटर्स क्लबच्या सर्व सदस्यांनी प्रत्येकी 4 हजार रुपये काढून आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान तयार केलं आहे.
धक्कादायक बाब म्हणजे फिफा वर्ल्ड कप संपल्यानंतर तात्काळ मैदान तोडण्याची नोटीस सिडकोने क्लबला बाजावली आहे. फिफा वर्ल्डकपनंतर या मैदानात इतर खेळाडूंना खेळता येईल. मात्र, स्वतःच्या स्वार्थासाठी नवी मुंबईतील खेळाडूंचे भविष्य उद्ध्वस्त करण्याचे काम सिडकोचे अधिकारी करत आहेत. तसेच सिडकोचे अधिकारी फिफाच्या एनओसीच्या नावाखाली आम्हाला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्नही करत असल्याचा आरोप स्पोर्ट्स क्लबने केला आहे.