मुंबई : राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबई काँग्रेसने आंदोलन केले. संजय निरुपम आणि सचिन सावंत यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन झाले. प्रकाश मेहता यांच्यावर एसआरए घोटाळ्याचा आरोप आहे.


संजय निरुपम यांनी राजीनामा घेऊन त्यावर सही करण्याचं आवाहन प्रकाश मेहतांना केलं. त्यांनी घाटकोपरमधील मेहतांच्या घरात घुसण्याचाही प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी संजय निरुपम आणि सचिन सावंत यांना अडवलं. त्यानंतर दोघेही रस्त्यावरच ठाण मांडून बसले. त्यानंतर पोलिसांनी निरुपम आणि सावंत यांना ताब्यात घेतले आणि काही वेळाने सोडून दिले.

काँग्रेसमध्येच फूट

मुंबई काँग्रेसच्या आंदोलनाआधी युवा काँग्रेसने आंदोलन केले आणि काँग्रेसमधीलच फूट पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली. संजय निरुपम यांचं भाषण सुरु असतानाच या काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

प्रकाश मेहतांवर एसआरए घोटाळ्याचा आरोप

मुंबईतील ताडदेवमधल्या एम. पी. मिल कम्पाऊंड येथील एसआरए प्रकल्पात एफएसआय घोटाळा केल्याचा आरोप गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर आहे. विकासकाला फायदा देण्यासाठी प्रकाश मेहता यांनी नियम बाजूला ठेवून एफएसआय अन्यत्र वापरास मंजुरी दिल्याचा आरोप होत आहे.

3K च्या नियमात एका विकासकाला फायदा देण्यासाठी धोरण ठरवता येत नसल्याचं कारण सांगत गृहनिर्माण विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांनी प्रस्तावाला विरोध केला होता. तसंच पीएपी (प्रकल्पबाधितांची घरं) संदर्भातही प्रस्तावावरही त्यांनी प्रतिकूल शेरा मारला होता. पण मेहता यांनी ही फाईल मंजूर करताना मुख्यमंत्र्यांना अवगत केल्याचा शेरा मारला होता.