Rickshaw-Taxi Corporation : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) लवकरच रिक्षा-टॅक्सी चालक मालक कल्याणकारी महामंडळ (Rickshaw-Taxi Drivers Owners Welfare Corporation) स्थापन करणार आहेत. माजी मंत्री उदय सामंत, माजी महापौर नरेश म्हस्के आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर हे महामंडळ तयार करण्याची जबाबदारी असेल. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी रिक्षावाला, पानटपरीवाला, वॉचमन अशी टीका केली होती. या टीकेला उत्तर म्हणून या घटकांची प्रगती करण्यासाठी महामंडळ आणि योजना सुरु करणार आहे.
कसं असणार रिक्षा-टॅक्सी महामंडळ?
- परिवहन किंवा कामगार विभागाच्या अंतर्गत महामंडळ स्थापन करणार
- राज्यात साडेआठ लाख रिक्षा आहेत
- तर 1 लाख 20 हजार टॅक्सी आहेत
- 60 वर्षांनंतर चालकांना निवृत्ती वेतन मिळणार
- महिलांना प्रसुतीसाठी मदत केली जाणार
- चालकांसाठी वेगळे हॉस्पिटल असणार
संजय राऊत काय म्हणाले होते?
"गुलाबराव पाटील हे आमदार होण्याआधी पानटपरी चालवायचे त्यानंतर ते कॅबिनेट मंत्री झाले मात्र ते आता पुन्हा पानटपरीवर बसतील," अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दहिसर इथे पार पडलेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात केली होती. "संदिपान भुमरे यांना पहिलं तिकीट मिळालं तेव्हा ते पैठणच्या साखर कारखान्यात वॅाचमन होते. मोरेश्वर सावेंचं तिकीट कापून बाळासाहेबांनी साधा शिवसैनिक म्हणून त्यांना तिकीट दिलं होतं," असं राऊत म्हणाले.
रिक्षावाला, पानटपरीवाला, हातभट्टीवाला... यांना शिवसेनाप्रमुखांनी खासदार आमदार, मंत्री बनवलं : उद्धव ठाकरे
रिक्षावाला, पानटपरीवाला, हातभट्टीवाला... ज्यांना शिवसेनाप्रमुखांनी मोठं केलं, त्यांनीच त्यांच्या पुत्राला मुख्यमंत्रीपदावरुन खाली खेचण्याचं पुण्य कमावलं, त्यांना ते कमवू द्या असं सांगत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. "साधी माणसं, कुणी रिक्षावाले, कुणी टपरीवाले तर कुणी हातभट्टीवाले... या सर्वांना शिवसेनाप्रमुखांनी माणसात आणलं, आमदार, खासदार बनवलं, मंत्री बनवलं. पण हे लोक मोठे झाल्यानंतर नाराज झाले. ज्यांना सर्वकाही दिलं ते नाराज झाले...पण ज्यांना काहीच दिलं नाही ते सोबत राहिले, तेच शिवसैनिक आहेत," असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.
एकनाथ शिंदे - सुपरव्हायझर... रिक्षाचालक ते थेट नगरसेवक
एकनाथ शिंदे यांनी 30 जून रोजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे म्हणजे, कडवट शिवसैनिक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे खंदे कार्यकर्ते. आनंद दिघेंसोबत आपला राजकीय प्रवास सुरु करणारे एकनाथ शिंदे गेली अनेक वर्षे शिवसेनेसोबत सक्रिय राजकारणात आहेत. आनंद दिघेंनंतर ठाण्यात शिवसेना वाढवण्याचं काम एकनाथ शिंदेंनी एकहाती केलं. एक रिक्षाचालक ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. सुरुवातीच्या काळात ते ठाण्याच्या प्रसिद्ध वागळे इस्टेटमधील एका माशांच्या कंपनीत सुपरव्हायझर म्हणून कामाला होते. कालांतराने त्यांनी ही नोकरी सोडत आत्मनिर्भर व्हायचं ठरवलं आणि ठाण्यात ऑटो रिक्षा चालवू लागले. काम करत असताना एकनाथ शिंदे यांच्या आयुष्याला दोन व्यक्तींमुळे कलाटणी मिळाली. त्या व्यक्ती म्हणजे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाण्याचे शिवसेना नेते आनंद दिघे. वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला आणि पक्षाच्या कामाला सुरुवात केली. पक्षाची कामं करताना शिंदेंना आनंद दिघेंचा सहवास लाभला आणि त्यांच्या प्रति विश्वास वाढू लागला. कालांतरानं एकनाथ शिंदे आनंद दिघेंचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाऊ लागलं. पक्षाप्रतिची निष्ठा पाहुन एकनाथ खडसेंना त्यांच्या कामाची पावती मिळालीच. 1984 साली वयाच्या विसाव्या वर्षी एकनाथ शिंदे यांच्यावर आनंद दिघेंनी जबाबदारी सोपवली. ठाण्याच्या किसन नगरचं शाखाप्रमुख पद त्यांना देण्यात आलं. इथूनच खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदेंच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली.