Mumbai News : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि एका चिमुकलीमधील संवादाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होत आहे. या मुलीने एकनाथ शिंदे यांना अनेक प्रश्न विचारले पण तिच्या एका प्रश्नाने सगळ्यांचीच उत्सुकता मात्र वाढवली. "येणाऱ्या दिवाळीच्या सुट्टीत मला गुवाहाटीला (Guwahati) फिरायला घेऊन जाणार का?" असा प्रश्न या मुलीने विचारला आणि एकच हशा पिकला. त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, "नक्कीच, कामाख्या मातेच्या दर्शनासाठी आपण जाऊया."
व्हायरल झालेल्या या व्हिडीओमधील मुलीचं नाव अन्नदा दामरे असून तिचं वय जवळपास पाच ते सहा वर्ष असावं. ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बोलताना दिसत आहे. मुंबईतील नंदनवन बंगल्यात या चिमुकलीची मुख्यमंत्र्यांसोबत भेट झाली. यावेळी ती मुख्यमंत्री बनण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडे सल्ला मागताना दिसत आहे. "जेव्हा आसाममध्ये पूर आला होता तेव्हा तुम्ही पाण्यातून वाट काढत पूरग्रस्तांना मदतीसाठी गेला होता. मी पण पूरग्रस्तांना मदत केली तर मुख्यमंत्री बनू शकते का?" असा प्रश्न तिने केला. त्यावर "हो, अवश्य बनू शकते," असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिली.
पुढे ही मुलगी एकनाथ शिंदे यांचं कौतुक करताना दिसत आहे. "पहिल्यांदा मला केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आवडत होते पण आता तुम्ही देखील मला आवडता," असं ही मुलगी म्हणाली.
या संवादाच्या शेवटी मुलीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून एक वचन घेतलं. येत्या दिवाळीच्या सुट्टीत तुम्ही मला गुवाहाटीला फिरायला घेऊन जाणार का? असा प्रश्न विचारला. त्यावर नक्कीच. कामाख्या मातेच्या दर्शनासाठी आपण जाऊया असं मुख्यमंत्री म्हणाले.
यानंतर मुख्यमंत्र्यांनी या चिमुकलीला तिचं नाव विचारलं. अन्नदा माझं नाव असल्याचं तिने सांगितलं. या संवादानंतर एकनाथ शिंदेंनी खोलीतील उपस्थितांकडे पाहिलं आणि "मुलगी हुशार आहे," असं शिंदे म्हणाले.
शिवसेनेत बंडखोरी, गुवाहाटीत वास्तव्य आणि काय झाडी, काय डोंगार, काय हाटील....
मागील महिन्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केली. शिवसेनेचे सुमारे 39 आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला होता. यामुळे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अखेरीस पद सोडावं लागलं. एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार 22 जून रोजी सूरतहून गुवाहाटीला दाखल झाले होते. आसाममध्ये पूरस्थिती असतानाही शिंदे गट गुवाहाटीला गेला. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं केंद्र गुवाहाटी बनलं. हॉटेल रॅडिसन ब्लूमध्ये सगळ्याचा मुक्काम होता. त्यातच सांगोल्यातील आमदार शहाजीबापू पाटील यांचा फोनवरील संवाद तुफान व्हायरला झाला. काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, एकदम ओकेमध्ये असा हा डायलॉग म्हणत शहाजीबापू पाटील चर्चेचा विषय बनले. यानंतर आठ दिवसांनी 30 जून रोजी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रचे मुख्यमंत्री म्हणून आणि भाजपचे देवेंद्र फडणवी यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.