Raj Thackeray In Action Mode : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (Mumbai Municipal Corporation Election) पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. राज ठाकरे स्वत: मुंबई विधानसभा निहाय आढावा घेत आहेत. आज (19 जुलै) ईशान्य मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे बैठक घेत आहेत. आज सकाळी आठ वाजल्यापासून या बैठका सुरु आहेत.
या बैठकांमध्ये प्रत्येक पदाधिकारी आपला कार्य अहवाल राज ठाकरे यांच्यासमोर मांडत आहेत. तसेच संघटनात्मक बांधणी, पक्षीय स्थिती, स्थानिक परिस्थिती तसेच निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणारे पदाधिकारी या सर्वांचा बैठकीत आढावा घेतला जाणार आहे.
या बैठका संदर्भात मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे म्हणाले की, आज विभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्ष यांची बैठक पार पाडली. आठवडाभर या बैठकांचं सत्र पार पडणार आहे. महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर या बैठका सुरु आहेत. तसेच राज्यात जे सुरु आहे ते पाहून गंमत वाटते आहे. लोकांचं चांगलं मनोरंजन सुरु आहे. हे जे काही चाललं आहे त्यामुळे राज ठाकरे यांच्यावरचा विश्वास लोकांचा वाढत चालला आहे.
राज ठाकरे यांच्या पायावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना काही काळ विश्रांतीचा सल्ला दिला होता. राज ठाकरेंची प्रकृती आता उत्तम असून तेही पक्ष कार्यक्रमांत सक्रिय होत आहेत. काही दिवसांपूर्वी मनसेचे महत्त्वाचे नेते, सरचिटणीस आणि विभाग अध्यक्षांची बैठक मुंबईत झाली, ज्यात त्यांनी मार्गदर्शन केलं.
अमित ठाकरे यांचं महासंपर्क अभियान
एकीकडे राज ठाकरे पुन्हा सक्रिय होत असताना त्यांचे पुत्र अमित ठाकरे महासंपर्क अभियान घेत आहेत. अमित ठाकरे यांनी नुकताच कोकण दौरा केला होता. यात अमित ठाकरेंनी मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या बांधणीवर विशेष लक्ष दिलं. राज्यातील सध्याच्या परिस्थितीचा फायदा पक्षाला कसा होऊ शकेल यावर लक्ष केंद्रीत करत तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी मनसेचा गनिमीकावा सुरु आहे.