कल्याण : मुंबई महापालिकेच्या प्रस्तावित डम्पिंगमुळे चर्चेत आलेल्या अंबरनाथच्या करवले गावात अवैध पद्धतीनं केमिकल डम्पिंग केलं जातं असल्याचा प्रकार समोर आला आहे. या डम्पिंगमुळे स्थानिकांच्या जमिनींचं मोठं नुकसान होण्याची भीती आहे.


करवले गावालगत असलेल्या एका खासगी जमिनीत खड्डे खणून केमिकल वेस्ट असलेले ड्रम आणि बॅरेल्स पुरले जात होते. याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाड मारत जागमालक किसन भंडारी आणि जेसीबी चालक हमीद अन्सारी यांना ताब्यात घेतलं.


अटक केलेल्या दोघांकडे चौकशी केली असता त्यांनी अशाचप्रकारे 100 ड्रम हे करवले गावात डोंगराच्या पायथ्याशी पुरल्याची कबुली दिली, तर पुरण्यासाठी आणलेले तब्बल 314 ड्रम करवले गावात आढळून आले. या सर्व ड्रममध्ये रासायनिक कंपन्यांचं केमिकल वेस्ट आणि घातक रसायनं असून हे केमिकल जमिनीत पुरल्यामुळे आसपासच्या जमिनी नासण्याची भीती निर्माण झाली आहे.


या प्रकरणाचा तपास पोलिसांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे दिला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने या केमिकल्सचे नमुने ताब्यात घेत तपासणीसाठी पाठवले असून हे केमिकल ज्या कंपनीचं असेल, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी धनंजय पाटील यांनी दिली आहे.