नवी मुंबई : सानपाड्यातील नागरिक आज सिडकोविरोधात रस्त्यावर उतरले होते. सिडकोने मशिद उभारण्यासाठी सानपाडा येथे जागा दिली होती. मात्र सानपाड्यातील स्थानिक नागरिकांचा याबाबत तीव्र विरोध आहे. त्यामुळे स्थानिकांना आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे.
सिडकोने मुस्लीम बांधवांना मशिद उभारणीसाठी सानपाडा सेक्टर-8 मध्ये जागा दिली आहे. मात्र सानपाडा परिसरात केवळ 70 मुस्लीम कुटुंबीय आहेत. त्यामुळे याठिकाणी मशिद उभी राहण्याची गरज नसल्याचं रहिवाशांचं म्हणणं आहे.
याबाबत सिडकोकडे पत्रव्यवहार करुनही कोणतीच दाद मिळत नसल्याने सानपाडा रहिवाशांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले. मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेल्या रहिवाशांनी गणपती मंदिरात महाआरती करुन मोर्चा काढला. यावेळी सायन-पनवेल महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला.
आंदोनकांनी भजन म्हणत आंदोलन केलं, तर सामूहिक मुंडन करुन सिडकोचा निषेध केला. सायन-पनवेल हायवेवर रास्ता रोको केल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
मशिदसाठी दिलेला भूखंड रद्द न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अखिल सानपाडा रहिवाशी संघाने दिला आहे. दरम्यान रास्ता रोको करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतलं.