Chembur Fire मुंबई: चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीतील एका घराला रविवारी पहाटे लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला. त्यात तीन महिला आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. 


चेंबूरमधील सदर आग शॉर्ट सर्किटमुळे (Chembur Fire) लागल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली असली, तरी या घराच्या तळमजल्यावरील दुकानात ठेवलेल्या रॉकेलच्या साठ्याचा भडका उडाल्याने मोठा अनर्थ घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याचदरम्यान नेमकं काय घडलं?, हे गुप्ता कुटुंबाच्या शेजारी राहणाऱ्या कमल रणदिवे यांनी सांगितलं. 


गुप्ता आणि कमल रणदिवे कुटुंबीयांच्या घराची भिंत सामाईक होती. त्यामुळे या दुर्घटनेतून रणदिवे कुटुंब थोडक्यात बचावले. पहाटे पळा पळा असा आवाज येत होता. त्यामुळे पटकन दारात जाताच बाहेर आग पसरली होती. यामुळे धराबाहेर पडण्याचा मार्ग देखील बंद झाला होता. बाजूच्या घरात लागलेल्या आगीमुळे घराच्या भिंतींना तडे जाण्यास सुरुवात झाली. त्यामुळे माझ्या 7 वर्षांच्या मुलीला घट्ट मिठी मारली आणि आगीतून उडी मारत मी, पती आणि दीर घराबाहेर पडलो, असं कमल रणदिवे यांनी सांगितले. 


उशिरापर्यंत घराबाहेर त्या मस्ती करीत होत्या-


उशिरापर्यंत माझ्या मुलीसोबत गुप्ता कुटुंबीयांची मुलगी खेळत होती. तिच्या आईनेच माझ्या मुलीला आपल्या मुलीसोबत खेळण्यासाठी बोलावून घेतले होते. उशिरापर्यंत घराबाहेरच नेहमीप्रमाणे त्या मस्ती करीत होत्या. पहाटे झोप लागली आणि अचानक उष्णता जाणवायला लागली. वातावरणामुळे असेल म्हणून दुर्लक्ष केले. पण काही वेळाने आरोळ्या ऐकू आल्या, बाहेर पाहिले तर आगीचे लोळ गुप्ता कुटुंबाच्या घराच्या वरच्या मजल्यापर्यंत पोहोचले होते.


आग रॉकेलच्या बॅरेलमुळे जास्त भडकली-


शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती असली तरी दुकानात लागलेली आग रॉकेलच्या बॅरेलमुळे जास्त भडकली, अशी माहिती अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिली. घरात खाली दिवा पेटता होता त्यातून ही आग वर पर्यंत लागली. त्यावेळी छेदिराम गुप्ता व त्यांचा मुलगा धर्मदेव गुप्ता हे  घराबाहेर पडले. मात्र, घरामध्ये वर असलेल्या  गीतादेवी छेदिराम गुप्ता, अनिता धर्मदेव गुप्ता, विधी धर्मदेव गुप्ता, नरेंद्र धर्मदेव गुप्ता, प्रेम छेदिराम गुप्ता, मंजू प्रेम गुप्ता हे घरातच अडकून पडले. त्यामुळे सर्वजण आगीमुळे होरपळले. स्थानिक आणि अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर जखमींना चेंबुरच्या झेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दुर्घटनेत जवळपास सगळे गुप्ता कुटुंबिय गेले. मात्र, हयात असणाऱ्यांना सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. 


संबंधित बातमी:


मुंबईत साखरझोपेत असताना कुटुंबावर काळाचा घाला, चाळीतील आगीत 7 जणांचा होरपळून मृत्यू