मुंबई: चेंबुरच्या सिद्धार्थ कॉलनीतील पहाटे लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचादेखील समावेश आहे. या दुर्घटनेत गुप्ता कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चेंबूर येथील सिद्धार्थ कॉलनीच्या के. एन. गायकवाड मार्गावरील गांगुर्डे प्लॉट नंबर १६ येथील छेदिराम अलगुराम गुप्ता (70 वर्ष) यांच्या राहत्या घराला आग (Chembur Fire) लागली. गुप्ता यांचे राहते घर 1+2 पोटमाळ्याचे असून घराला तळमजल्यावर किराणा मालाचे दुकान होते. या दुकानामध्ये रॉकेलचे कॅन ठेवण्यात आले होते. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, घराच्या मीटर बॉक्समध्ये शॉक सर्किटमुळे ही आग लागली आणि बघता बघता संपूर्ण घरात पसरली.
चेंबूरमध्ये सिद्धार्थ कॉलनी आहे. या कॉलनीत दाटीवाटीनं घरं आहे. मोठ्या प्रमाणात लोक इथं राहतात. सतत गजबज असलेला हा भाग आहे. शनिवारी रात्री इथं सर्व जण झोपेत असताना ही दुर्घटना घडली. पहाटे साडेचार वाजता घरात आग लागली. झोपेत असल्याने अनेकांना काय घडलं हे समजलंच नाही. ज्यावेळी समजलं त्यावेळी मात्र फार उशीर झाला होता, हे आता समोर येत आहे.
आग कशामुळे भडकली?
शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती असली तरी दुकानात लागलेली आग रॉकेलच्या बॅरेलमुळे जास्त भडकली, अशी माहिती अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिली. घरात खाली दिवा पेटता होता त्यातून ही आग वर पर्यंत लागली. त्यावेळी छेदिराम गुप्ता व त्यांचा मुलगा धर्मदेव गुप्ता हे घराबाहेर पडले. मात्र, घरामध्ये वर असलेल्या गीतादेवी छेदिराम गुप्ता, अनिता धर्मदेव गुप्ता, विधी धर्मदेव गुप्ता, नरेंद्र धर्मदेव गुप्ता, प्रेम छेदिराम गुप्ता, मंजू प्रेम गुप्ता हे घरातच अडकून पडले. त्यामुळे सर्वजण आगीमुळे होरपळले. स्थानिक आणि अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर जखमींना चेंबुरच्या झेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दुर्घटनेत जवळपास सगळे गुप्ता कुटुंबिय गेले. मात्र, हयात असणाऱ्यांना सरकारकडून शक्य तेवढी मदत करण्यात येणार आहे .
या घटनेत गेल्या सत्तर वर्षापासून मुंबई चेंबूर भागात राहणारे गुप्ता यांचा धर्मदेव हा मुलगा वगळता सर्व कुटुंब आगीत जळून मृत्यूमुखी झाले. छेदिराम गुप्ता स्वतः जखमी असून पुढील उपचाराकरता राजावाडी रुग्णालयात दाखल आहेत. तर मुलगा धर्मदेवला उपचारानंतर सोडण्यात आले आहे. गुप्ता कुटुंबीयांना सरकारच्या वतीने मदत करण्याची घोषणा देखील झाली आहे. मात्र, छदीराम आणि धर्मदेव यांचं कालपर्यंत असणार सोन्यासारखं कुटुंब आगीत नाहीसं झालंय. त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
आणखी वाचा
मुंबईत साखरझोपेत असताना कुटुंबावर काळाचा घाला, चाळीतील आगीत 7 जणांचा होरपळून मृत्यू